कराड – आपल्या तालुक्याचा आणि गावाचा विकास कुणी केला, याकडे लक्ष द्या. या निवडणुकीत प्रत्येक गावातील कार्यकर्ता विकासकामांची माहिती देतोय, याचा आनंद आहे. मात्र, चांगल्या कामात खोडा घालण्याचे काम विरोधक करत आहेत. चांगल्या कामाला नाव ठेवण्याचे काम विरोधक करत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करा. आपण जी चांगली कामे केली आहेत, ती घरोघरी पोहचविण्याचे आवाहन शंभूराज देसाई यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गावभेट दौर्यात चाफळ येथे ते बोलत होते. यावेळी मार्केट कमिटीचे संचालक राजेंद्र पाटील, संजय गांधी निराधारचे अध्यक्ष भरत साळुंखे, कारखान्याचे संचालक प्रशांत पाटील, पदाधिकारी उपस्थित होते. देसाई म्हणाले, चाफळ प्रभू श्रीरामांचे गाव आहे.
बाजारपेठेचा भाग असलेल्या चाफळ गावाचा विकास केला. विकासाबाबतीत पुढची दृष्टी ठेवून आपण काम केले पाहिजे. माझ्या पाठीशी हे गाव नेहमी ठामपणे उभे राहिले आहे. मतदारसंघात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि यापुढेही मिळत राहील, असा विश्वास देसाई यांनी याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी विभागातील शिवसैनिक, युवक, कार्यकर्ते, पदाधिकारी, घटक पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मतदार उपस्थित होते.