प्रशासनाचे आदेश पायदळी; पेट्रोल खरेदीसाठी परिसरातील लोकांची झुंबड
लोणंद – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने पेट्रोल विक्रीवर घातलेले निर्बंध धुडकावून लावत तरडगाव (ता. फलटण) येथील पंपावर खुलेआम पेट्रोल विक्री सुरु होती. लोणंद- तरडगाव रोडवर तरडगावच्या हद्दीतील इंडियन ऑइल कंपनीचा पेट्रोल पंप आहे. आज गुरुवारी दि. २६ रोजी सकाळच्या सुमारास या पंपावर खुलेपणाने पेट्रोलची विक्री चालू असल्याचे समजताच परिसरातील दुचाकी, चारचाकी वाहनांची पेट्रोल भरून घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली. शासनाने घातलेले निर्बंध झुगारून देऊन सर्रासपणे ही विक्री केली जात होती.
यावेळी पंपावर एवढी गर्दी होती की चार रांगा करूनही पंपाच्या बाहेर मुख्य रस्त्यावर मोठीच्या मोठी रांग पेट्रोल भरून घेण्यासाठी लागलेली होती. यावेळी पोलिसांनी येऊन या पंपावर चाललेली विक्री बंद केली. मात्र, तोपर्यंत तिथं जत्रेसारखी गर्दी जमलेली होती. करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य व देश पातळीवर कठोर निर्णय घेतले जात असताना ग्रामीण भागात अशा प्रकारे सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी केली जात आहे.
प्रशासन याप्रकरणी लक्ष घालून कठोर कारवाई करणार का, की नेहमीप्रमाणे राजकीय हस्तक्षेप होऊन असे लोक सही सलामत सुटणार, हे आगामी काळातच स्पष्ट होईल. चुकीच्या पद्धतीने विक्री केल्या प्रकरणी संध्याकाळी ऊशीरा पर्यंत लोणंद पोलिस ठाण्यात कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल केलेली नव्हती.