राफेल’ची आकाशात भरारी-एयरो इंडिया शो’चे उदघाटन

बेंगळुरू (कर्नाटक) – एयरो इंडिया शो’चे आज संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी उद्घाटन केले. त्यानंतर बेंगळुरूच्या आकाशात प्रथमच राफेल विमान भरारी घेताना दिसले. एशियातील सर्वात मोठ्या लष्करी विमानचालन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे उपस्थित होते.

आज सुरू झालेला एयरो इंडिया शो 24 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. रनवे टू बिलियन ऑपॉर्च्युनिटीज थीमवरील एयरो इंडिया शो एशियातील सर्वात मोठे विमान प्रदर्शन आहे. 100 पेक्षा अधिक देश यामध्ये सहभागी होतात. संरक्षण विषयक सर्व प्रकारच्या उपकरणांच्या या प्रदर्शनात विमान क्षेत्रातील बडे गुंतवणूकदार, अमेरिकेची बोइंग आणि फ्रान्सचे राफेल या बड्या कंपन्या आणि जागतिक नेत्यांबरोबरच अनेक “थिंक टॅंक’ यामध्ये सहभागी होत असतात.

विमान क्षेत्रात होणारी प्रगती आणि नवीन कल्पना जगासमोर मांडण्यासाठी हा एक मोठा मंच आहे. मेक इन इंडिया’ला उत्तेजन देणे हा देखील यामागचा एक हेतू आहे. त्यामुळेच डीआरडीओ (डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन) चा यात मोठा सहभाग आहे. डीआरडीओ यामध्ये सुमारे 250 प्रणाली, तंत्रे, सक्रिय नमुने आणि अलीकडील नवकल्पना मांडणार आहे.

ध्वनितीत वेगाने राफेल विमानाने भरारी मारताच सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळून राहिल्या. राफेलने आणि त्यापूर्वी तेजस, सुखोई-30, एमकेआय, एनएएल निर्मित एलसीएच लाइट कॉंबॅट हेलिकॉप्टर यांनीही चित्तथरारक हवाई कसरती दाखवल्या.
एकच दिवस अगोदर, मंगळवारी सकाळी येलहांका विमान अड्ड्यावर दोन सूर्यकिरण विमानांची टक्कर झाल्याने सूर्यकिरण विमाने एयरो इंडिया शोमध्ये सहभागी झाली नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.