मुंबई – इंग्लंड दौऱ्यात जखमी झालेल्या खेळाडूंची जागा घेण्यासाठी सलामीवीर पृथ्वी शॉ आणि मधल्या फळीतील सूर्यकुमार यादव हे दोन मुंबईकर इंग्लंडला जाणार हे निश्चित झाले आहे. इंग्लंड दौऱ्यातील तीन खेळाडू जखमी झाल्यानंतर या दोघांना बदली खेळाडू म्हणून पाठवण्यात येणार आहे. इंग्लंड दौऱ्यावरील शुभमन गिल, आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर हे तीन खेळाडू जखमी झाल्याने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडले आहेत. त्यानंतर ती मागणी मान्य करण्यात आली आहे.
सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांची नावे निश्चित झाली आहेत. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर चेतन शर्मा यांच्या निवड समितीने ही नाव निश्चित केली आहेत. टीम मॅनेजमेंटने एकूण 3 खेळाडूंची मागणी केली आहे. मात्र, यामधील तिसरे नाव अद्याप नक्की झालेले नाही.
शुभमन गिल जखमी झाल्यानंतर लगेच भारतीय संघाने पृथ्वी शॉची मागणी केली होती. त्यावेळी निवड समितीने नकार दिला होता. आता जखमी खेळाडूंची संख्या वाढल्याने निवड समितीला ही मागणी मान्य करावी लागली.
सूर्यकुमार यादवने याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. इंग्लंड विरुद्धच्या टी20 मालिकेत चांगली कामगिरी केल्यानंतर त्याने श्रीलंका विरुद्धच्या वन-डे मालिकेतही दमदार प्रदर्शन केले आहे. याच सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची संधी मिळाली.