स्थगितीची मागणी हायकोर्टाने फेटाळली
मुंबई : कॉपीराईटसचा आरोप करण्यात आल्याने वादाच्या भोवऱ्यात अकडलेल्या पानिपत चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग आज मोकळा झाला. पानिपतकार विश्वास पाटील यांनी आपल्या कादंबरीतील घटना आणि तपशील परवानगी न घेताच वापरण्यात आल्याचा आरोप करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची विनंती न्या, एस.सी. गुप्ते यांनी आज फेटाळून लावली. ऐतिहासिक घटनांचा दाखला देताना कोणीही त्यावर आपला हक्क गाजवणे चुकीचे असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे शुक्रवारी या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला.
“पानिपत’ या आपल्या कांदबरीवरुन चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांनी या सिनेमाची निर्मिती केल्याचा आरोप विश्वास पाटील यांनी केला होता या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगितीची मागणी करणाऱ्या त्यांच्या याचिकेवर न्या. एस.सी. गुप्ते यांच्या समोर आज सुनावणी झाली. यावेळी पाटील यांच्यावतीने युक्तिवाद करताना “पानिपत’ या कादंबरीसाठी आठ वर्षे संशोधन केले आणि त्यानंतर “पानिपत’ची निर्मिती झाली, यावरुन “रणांगण’ हे नाटकही आले होते. त्या नाटकाचे सुमारे 400 प्रयोग झाले असून हे नाटकही खूप गाजले.
मात्र आता सिनेमामध्ये माझ्या कांदबरीतील प्रसंग आणि घटना घेण्यात आल्या असून त्यासाठी निर्मात्यांनी परवानगी घेतलेली नाही असा आरोप पाटील यांनी केला. आजवर केवळ आपणच मराठ्यांच्या या लढ्याला एक गौरवशाली लढा म्हणून ओळख मिळवून दिली. तसेच सिनेमामध्ये दाखवली गेलेली दृश्ये आणि घटना या आपण लिहिलेल्या कादंबरीतील कथेशी साधर्म्य साधतात. त्यामुळे आपली परवानगी न घेता बनवलेला हा सिनेमा आपल्याला एकदा दाखवावा किंवा प्रदर्शनाआधी त्याची स्क्रीप्ट आपल्याला देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी हायकोर्टाकडे केली होती. मात्र न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावली.
नवीन कथा पहायला मिळत असेल तर आनंद आहे – विश्वास पाटील
* विश्वास पाटील यांनी 1988 साली लिहिलेल्या पानिपतच्या आजवर 42 आवृत्या आल्या आहेत. तसेच ही कादंबरी विविध भाषांत भाषांतरीत करण्यात आली आहे. त्यावर आधारीत “रणांगण’ या नाटकाचे 400 हून अधिक प्रयोग झालेत. त्यानंतर जर निर्मात्यांच्या दाव्यानुसार आता पानिपतवरच्या लढाईवर आधारीत एक नवी कथा जर लोकांना पाहायला मिळणार असेल तर आनंदच आहे, असे मत विश्वास पाटील यांनी न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर व्यक्त केले.