पुणे – राज्य शासनाने राज्यातील अकृषि विद्यापीठांतील रिक्त असलेली शिक्षकांची पदे भरण्यावरील निर्बंध शिथिल केले आहेत. यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षकांची 111 पदे भरण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यात सहाय्यक प्राध्यापकांच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शासनाने 25 मे 2017 रोजीच्या निर्णयानुसार आकृतिबंध मंजूर होईपर्यंत नवीन पदनिर्मिती व पदभरतीवर निर्बंध घालण्यात आले होते. यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावर चर्चा करण्यासाठी शासनाच्या उपसमितीची बैठक 16 जुलै 2019 मध्ये झाली होती. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेऊन पदभरती करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली होती.
त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाने बुधवारी (दि.7) आदेश काढले आहेत. राज्यातील 15 अकृषि विद्यापीठे, शासनमान्य अभिमत विद्यापीठे यासाठी मंजूर असलेल्या 80 टक्के इतक्ता मर्यादेत पद भरती करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे रिक्तपदे भरण्यातील अडथळा दूर झाला आहे. राज्यातील विद्यापीठांत एकूण 2 हजार 534 शिक्षकांची पदे मंजूर आहेत. यातील 1 हजार 368 पदे भरलेली असून 1 हजार 166 पदे रिक्त आहेत. 80 टक्के इतक्या मर्यादेपर्यंत म्हणजेच 2 हजार 27 एवढी पदांची संख्या होणे आवश्यक आहे. यामुळे 659 एवढी रिक्त पदे आता भरता येणार आहेत. सहा महिन्यांत ही भरती प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
प्रस्ताव पाठवा
आवश्यकता असलेल्या शैक्षणिक विभागातीलच रिक्तपदे भरता येणार आहे. या विभागाचे मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन होण्यासाठी आवश्यक असलेली मर्यादा विचारात घेऊनच शिक्षकांच्या पदांचे वाटप करावे लागणार आहे. पदसंख्येच्या मर्यादेत रिक्तपदे भरण्यासाठी विद्यापीठांनी प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी सादर करावेत, असे आदेशही सचिवांनी यांनी विद्यापीठांना बजाविले आहेत.