सातारा – सध्या शहरातील सर्व प्रकारची कार्यालये, शाळा, महाविद्यालयाने सुरु झाल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहे. त्यातच ग्रेडसेपरेटरच्या बाजुबाजुच्या रस्त्यांचे डांबरीकरण सुरु असून केवळ या रस्त्यांचे डांबरीकरण करुन चालणार नाही, तर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी तात्काळ खुला करावा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या आहे.
पोवई नाका हे शहराचे मुख्य ठिकाण आहे. याठिकाणीच गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित ग्रेड सेपरेटरचे काम सुरु आहे. सध्या हे काम पुर्णत्वाच्या मार्गावर आहे. लॉकडाऊननंतर आता सर्व प्रकारची कार्यालये, शाळा, महाविद्यालये, दुकाने आणि बाजारपेठा सुरु झाल्याने सातारा शहरातील रस्त्यांवर वाहनांची गर्दी होत आहे. राजवाडा-पोवई नाका ते मध्यवर्ती बस स्थानक, पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरील ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाले आहे. पोवई नाका ते वायसी कॉलेज या मार्गावरील काम प्रगतीपथावर आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झालेले रस्ते वाहतुकीसाठी खुले करणे अत्यावश्यक आहे. ग्रेड सेपरेटरच्या आजूबाजूच्या रस्त्यांचे डांबरीकरण सध्या सुरु आहे. मात्र ग्रेड सेपरेटरमधून वाहतूक सुरु नसल्याने या रस्त्यांवर वाहतुकीचा ताण पडत आहे. गेले कित्येक वर्षांपासून ग्रेड सेपरेटरची चर्चा सुरु आहे. मात्र ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी खुला कधी होणार? याची उत्सुकता सातारकरांमध्ये आहे. त्यामुळे ग्रेड सेपरेटर तातडीने वाहतुकीसाठी खुला केला पाहिजे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.
याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. पुर्णत्वास गेलेल्या मार्गावरुन ग्रेड सेपरेटरमधील वाहतूक तत्काळ सुरु करा आणि उर्वरीत कामही तातडीने पूर्ण करुन ग्रेड सेपरेटर लोकांच्या सेवेत रुजू करा, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यान, रस्त्यांचे डांबरीकरण सुरु असून या कामांच्या दर्जाबाबत तडजोड करु नये. रस्त्यांची कामे दर्जेदार करावीत, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.