साताऱ्यात कॉर्पोरेट कचरा उघड्यावर

सातारा – स्वच्छ व सुंदर सातारा शहर प्रतिमा राखण्यासाठी एका बाजूला नगरपालिका प्रयत्न करत असताना आता शहरात कॉर्पोरेट कचऱ्याच्या समस्येने डोके वर काढले आहे. सध्या शहरातील खासगी बॅंका व इतर कार्यालयांचा कागदी कचरा उघड्यावर टाकण्यात येत आहे. त्यामुळे उघड्यावर कचरा टाकणाऱ्या सर्वसामान्य नागरिक व व्यवसायिकांवर ज्या प्रमाणे कारवाई करण्यात येते त्याप्रमाणेच कॉर्पोरेट कचरा टाकणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सातारा जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे विविध कंपन्यांच्या फायनान्स ऑफीस तसेच इतर कार्यालये शहरात आहेत.

प्रामुख्याने राधिका रोडवर कार्यालयांचे प्रमाण अधिक आहे. या परिसरात सध्या कार्पोरेट कंपन्यांमधील कागदी कचरा अक्षरश: उघड्यावर टाकल्याचे दिसून येते. वास्तविक त्या कचऱ्याची एकतर विल्हेवाट लावायची अथवा रोज घंटागाडीत तो कचरा टाकणे गरजेचे आहे. मात्र, तसे न करता तो परिसरातील अडगळीच्या ठिकाणी उघड्यावर टाकण्यात येत आहे. खरे तर शहर स्वच्छ व सुंदर रहावे, यासाठी पालिकेने कचराकुंडी मुक्त सातारा करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली.
शहरात सध्या कोठे ही कचरा कुंडी दिसून येत नाही.

रहिवासी नागरिक, हॉटेल व इतर व्यवसासियकांचा कचरा घंटागाड्यातच टाकण्यात येतो. त्याच प्रमाणे वैद्यकीय जैविक कचऱ्यासाठी देखील स्वतंत्र घंटागाडीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परिणामी शहरात स्वच्छता राखण्यात यश मिळाले आहे. मात्र, अशात कोर्पोरेटच्या कागदी कचऱ्याने डोके वर काढले आहे. त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग उघड्यावर कचरा टाकणाऱ्या कोर्पोरेट कंपन्यांवर काय कारवाई करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.