नवी दिल्ली – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनी आणि नौदल अकदमीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्यास अविवाहित महिलांना केंद्रीय लोकसेवा आयोगाने मान्यता दिली आहे, याबाबातचे अधिकृत निवेदन शुक्रवारी देण्यात आले. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या निर्णयानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार केंद्रीय लोकसेवा आयोगाने युपीएससीऑनलाईन डॉट एनआयसी डॉट इन (upsconline.nic.in)वर अर्ज उपलब्ध केले आहेत. राष्ट्रीयत्व, वय आणि शैक्षणिक आर्हतेविषयक अटीत बसणाऱ्या अविवाहित महिला यासाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. संरक्षण मंत्रालयाकडून मिळाल्यानंतर शारीरिक पात्रता आणि जागांची संख्या जाहीर करण्यात येईल, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
24 सप्टेंबर ते आठ ऑक्टोबर या कालावधीत अर्ज करण्यासाठी विंडो ओपन राहील, असे नमूद केले आहे. आठ ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजल्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. या अर्जासाठी महिला उमेदवारांना कोणताही आकार नसेल, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, ही परीक्षा 14 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.
नौदल अकादमी आणि संरक्षण अकादमीतील प्रवेश परीक्षा 2021 ही तात्पुरत्या स्वरूपाची असेल. त्यबाबतची अंतीम निर्णय सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या खटल्याच्या निकालानंतर स्पष्ट करण्यात येईल, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
राष्ट्रीय संरक्षण अकादमीत प्रवेश देण्यास महिलांना मान्यता देऊन लैंगिक समानतेच्या मुद्द्यावर महत्वपूर्ण निकाल 18 ऑगस्टला दिला होता. न्यामुर्ती एस. के. कौल आणि हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने हा अंतरीम आदेश दिला होता. कुश कालरा यांनी याबाबतची याचिका दाखल केली होती.