दिवसातून दोनच प्रयोग अन्‌ 50 टक्के प्रेक्षक?

नाट्यगृहे खुली करण्यासाठी नियम लागू होण्याची शक्यता

पुणे – नाट्यगृहे खुली करण्यासाठी कलावंतांनी एकत्र येत एक मार्गदर्शक प्रस्ताव राज्य सांस्कृतिक विभागाला दिला आहे. यानुसार नाट्यगृहांमध्ये दिवसातून दोनच प्रयोग आणि तिकीट विक्रीच्या ठिकाणी गर्दी टाळण्याबाबत विविध उपाययोजनांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर 50 टक्के प्रेक्षक उपस्थिती या नियमाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

नाट्यगृहे कधी उघडतील, याची राज्यभरातील कलावंताना प्रतीक्षा आहे. दरम्यान, लवकरच नाट्यगृह खुले करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहे. त्यामुळे कलावंतांच्या अपेक्षा पल्लवित झाल्य आहेत. राज्य सरकारकडून नाट्यगृहांबाबत मार्गदर्शक तत्वांची निश्चिती करण्याचे काम सुरू आहे. यासाठी नाट्यकलावंतांकडून प्रस्तावदेखील मागविण्यात आला होता, अशी माहिती पुण्यातील “संवाद’ संस्थेचे सुनील महाजन यांनी दिली.

 

महाजन म्हणाले, “नाट्य कलावंताच्या संथांनी एकत्र येऊन सादर केलेल्या एसओपी प्रस्तावानुसार, सद्यस्थितीत नाट्यगृहांमध्ये दिवसातून दुपारी 12 आणि सायंकाळी 5 वाजता असे दोनच प्रयोग घेण्यात येतील. मध्यंतरीच्या काळात नाट्यगृहाची स्वच्छता करणे, तो सॅनिटाइज करणे ही कामे केली जातील. त्याचबरोबर तिकीट विक्रीच्या ठिकाणी गर्दी टाळण्याबाबत विविध उपाययोजनांची तरतूद करण्यात आली आहे. प्रेक्षागृह प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझरची व्यवस्था आणि सुरक्षिततेच्या नियमांबाबत जनजागृती करण्याची व्यवस्था करणे अशा विविध मुद्यांचा समावेश यामध्ये आहे.’

 

राज्य सरकारने सिनेमागृहे खुली करण्यासाठी 50 टक्के प्रेक्षक उपस्थितीची मर्यादा ठेवली आहे. त्यानुसार नाट्यगृहांसाठीही तेवढीच प्रेक्षक संख्या लागू करण्याची शक्यता आहे. यामुळे उत्पन्नावर परिणाम नक्कीच होईल. परंतु काहीच काम नसण्यापेक्षा थोड्या प्रमाणात का होईना, पण काम सुरू होणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.