पिंपरी – महापालिका प्रशासनाने क क्षेत्रीय कार्यालयात आयोजित केलेली जनसंवाद सभा शांततेत पार पडली. या सभेला उपस्थित असलेल्या आठ नागरिकांनी एकूण 12 तक्रारी प्रशासनाकडे मांडल्या. त्यापैकी सर्वाधिक तक्रारी रस्त्यालगतच्या पेव्हिंग ब्लॉक व चेंबर दुरूस्तीबाबत होत्या.
क क्षेत्रीय कार्यालयात पार पडलेल्या या सभेत प्रशासनाच्या वतीने सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांनी तक्रारी स्वीकारल्या. पेव्हर ब्लॉकविषयी नेहा सोसायटी, खराळवाडी व क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील एक अशा एकूण तीन तक्रारी प्रशासनाला मिळाल्या आहेत. याशिवाय खराळवाडी, आंबेडकरनगर झोपडपट्टी व अन्य एका ठिकाणी चेंबर ब्लॉकेजची तक्रार करण्यात आली आहे.
याशिवाय भटकी कुत्री पकडून नेणे, सीमाभिंत बांधणे, एमआयडीसीथील कचरा वेळेवर उचलण्यात यावा, अतिक्रमण हटविणे तसेच कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम पूर्ववत सुरू करण्याची मागणी या सभेत करण्यात आल्या. या सर्व तक्रारी स्वीकारल्यानंतर त्या संबंधित विभागाकडे पाठविण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.