कात्रज बाह्यवळण रस्त्याचे काम वेगाने करण्याच्या सूचना
आंबेगाव बुद्रुक : कात्रज ते नवलेपूल बाह्यवळण महामार्गाचे रुंदीकरण कामाचे काही दिवसांपूर्वी उद्घाटन झाले असून कामाची प्रक्रिया सुरू झाली आहे. सदर काम पूर्ण करण्यास दीड वर्षांची मुदत दिली असून गेल्या दोन महिन्यांपासून केवळ ट्रायल पॅचचे कामही पूर्ण झालेले नाही. यामुळे दिलेल्या कालावधीत या रस्त्याचे काम पूर्ण होणे अशक्य आहे. या कामातील त्रुटी तसेच उद्भवणाऱ्या नागरी समस्यांबाबत नगरसेवक युवराज बेलदरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर खासदार सुळे स्वत: रस्त्यावर उतरल्या. त्यांनी अधिकारी, ठेकेदार यांच्यासह या रस्त्याची पाहणी करीत काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.
दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, जांभूळवाडी परिसरात लोकसंख्या वाढत असून पर्यायाने वाहतूक वाढली आहे. गेली अनेक दिवसांपासून या भागात वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर विकास आराखड्यातील त्रुटी पूर्ण करून सदर रस्त्याचे काम दिलेल्या कालावधीत पूर्ण व्हावे व आवश्यकतेनुसार रस्त्याची उंची वाढवून भुयारी मार्ग व्हावेत. नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक बदल करून परिपूर्ण रस्ता विकसन व्हावे, अशी मागणी नगरसेवक युवराज बेलदरे यांनी यावेळी खासदार सुळे यांच्यासह अधिकाऱ्यांकडे केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्षा रूपाली चाकणकर, स्वाती पोकळे, नगरसेविका अमृता बाबर, संतोष फरांदे, नगरसेवक विशाल तांबे, सुधीर कोंढरे, अनिल कोंढरे, सहाय्यक अभियंता राहुल कुलकर्णी उपस्थित होते.