- रुग्णवाढीला पिंपरी महापालिकाच ठरतेय कारणीभूत
- रुग्णाने व्यक्त केली दैनिक प्रभातकडे भावना
पिंपरी – अंगात ताप, सतत येणारा खोकला आणि वारंवार दम लागणे ही करोनाची लक्षणे असली तरी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागास हे निदर्शनास कसे येत नाही, हे नवलंच आहे. करोनाची लक्षणे असणारा एक रुग्ण सोमवारी (दि. १३) सकाळी महापालिकेच्या ‘वायसीएम’ रुग्णालयात तपासणीकरिता गेला. मात्र तुम्हाला काहीही झालेले नाही, असे सांगून त्यास गोळ्या देऊन थेट घरी पाठविले. परंतु इतरांच्या मदतीने प्रशासनावर दबाव आणून त्या रुग्णाची तपासणी केली असता ‘तो’ करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. आता ‘वायसीएम’ रुग्णालयाचा हा भोंगळ कारभारच करोनाच्या प्रसाराला पोषक ठरत असल्याने नागरिकांनी चीड व्यक्त केली आहे.
निगडीतील एका रुग्णास गेल्या चार-पाच दिवसांपासून ताप येत असल्याने तो स्थानिक डॉक्टरांकडे गेला. त्यांनी ‘व्हायरल इन्फेक्शन’ असल्याचे सांगत त्यास गोळ्या-औषधे दिली. मात्र त्यानंतरही ताप कमी जास्त येतच होता. त्यामुळे तो रुग्ण वायसीएम रुग्णालयात तपासणीसाठी गेला. मात्र तिथे असलेल्या डॉक्टरांनीही त्यास केवळ गोळ्या-औषधे देऊन घरी जाण्यास सांगितले.
रुग्णास जास्त त्रास होत असल्याने त्यांनी करोना चाचणी करण्याचा आग्रह केला. मात्र त्यावरही प्रशासनाने ‘त्या ’रुग्णाला घरी जाण्याचा सल्ला दिला. शेवटी त्या रुग्णाणेच आपल्या ओळखीचा वापर करत प्रशासनावर दबाव आणला. त्यावेळी मात्र प्रशासनाने चाचणी करण्याचा निर्णय घेतला. वायसीएम रुग्णालयासमोर असलेल्या जैन शाळेत त्यांची करोनाची चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये तो करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले.
जर तो रुग्ण घरी गेला असता, तर त्याच्यामुळे आणखी काही जणांना करोनाची लागण झाली असती. तसेच त्या रुग्णास मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता. तो घरी गेला असता तर त्याच्या जीवावरही बेतले असते. या रुग्णाने ‘ओळख’ वापरल्यामुळे त्याची करोना चाचणी होऊ शकली; मात्र ज्या सामान्य रुग्णांची कोणाशी ओळख नाही त्यांचे काय हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. अशा प्रकारे रुग्णांना घरी पाठवत असल्यामुळे करोना संक्रमणाचा धोका वाढला आहे. वायसीएम रुग्णालयाचा हा गलथान कारभार करोनाच्या प्रसारासाठी पोषक ठरत आहे.
दैनिक प्रभातशी बोलताना रुग्णांने सांगितले की, मला गेल्या दोन-तीन दिवसांपासून ताप येत आहे. मी खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेलो होतो. त्यानंतरही मला आराम वाटला नाही. त्यामुळे मी सोमवारी वायसीएम रुग्णालयात चाचणी करण्यासाठी आलो. मला त्रास होत असल्याचे सांगूनही तेथील डॉक्टर आणि नर्स यांनी मला गोळ्या औषधे देत घरी जाण्याचा सल्ला दिला. परंतु मला करोना पॉझिटिव्ह असल्याचा संशय येत होता, त्यामुळे मी करोना चाचणी करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर माझी चाचणी करण्यात आली. त्यामध्ये माझा अहवाल सकारात्मक आला आहे.
– एक बाधित रुग्ण, निगडी.