राज्यातील युतीबद्दल बोलण्याचा फक्‍त तीनच व्यक्‍तींना अधिकार -गिरीश महाजन

मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत चर्चांना उधाण येत आहे. त्यातच शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी युतीबद्दल सुचक वक्‍तव्य करून एकच गोंधळ निर्माण केला आहे. शिवसेनेला 144 जागा मिळाल्या नाही तर युती तुटू शकते, असे दिवाकर रावते यांनी म्हटले होते. त्यावर आता भाजपकडून उत्तर देण्यात आले आहे. युती होणार आहे. युतीबद्दल बोलण्याचे अधिकार तीन व्यक्तीनांच आहे. त्यांच्याशिवाय कुणालाही अधिकार नाही, असे सांगत भाजपाचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रावते यांना टोला लगावला आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्‍यता असताना दोन्ही पक्षात बाहेरून मोठ्या प्रमाणात नेते आल्याने शिवसेना-भाजप स्वतंत्र लढण्याची तयारी करीत असल्याच्या चर्चा दबक्‍या आवाजात सुरू आहेत. दरम्यान, शिवसेनेला 144 जागा मिळाल्या नाही तर युती तुटू शकते, असे शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. त्यातच भाजपाचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जागावाटपावरून युती तुटू शकते हा दावा फेटाळला आहे. युतीच्या जागावाटपाचा प्रश्न वरिष्ठ पातळीवरील आहे. त्याबद्दल बोलण्याचा अधिकार फक्त तीन लोकांनाच आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तीन व्यक्तीनांच युतीबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. युती होणार आहे. पुढच्या चार ते पाच दिवसांत जागावाटपाचा तिढा सुटेल, असे महाजन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.