सातारा (प्रतिनिधी) – पूर्ण फी न भरणाऱ्या पाल्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवल्याचा आरोप, सातारा येथील युनिव्हर्सल नॉलेज स्कूलच्या पालकांनी केला. तेव्हा, खासगी शाळांचे शैक्षणिक शुल्क भरण्याची ऐपत असलेल्यांनीच आमच्या शाळेत पाल्याचा प्रवेश घ्यावा, असा अनाहूत सल्ला शाळा व्यवस्थापनाने दिल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आमच्या पाल्यांना शिकवण्यासाठी केलेल्या खर्चावर आधारित फी शाळेने आकारावी, अशी भूमिका पालकांनी मांडली.
याबाबत माहिती अशी, वर्ये (ता. सातारा) येथे युनिव्हर्सल नॉलेज स्कूल आहे. विसावा नाका येथे संस्थेचे कार्यालय व पूर्व प्राथमिकचे काही वर्ग चालतात. फी थकलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासमधून वगळण्यात आले होते.
या दरम्यान व्यवस्थापनाने एक पत्र पालकांना पाठवले असून, त्यातील मजकूर पालकांमधील असंतोषाचे कारण बनला आहे. त्यामुळे काही पालक शाळेच्या कार्यालयासमोर जमले होते. या पत्राद्वारे म्हटले आहे की, खासगी शाळांमध्ये शिक्षण घेण्याची ऐपत असलेल्यांनीच आपल्या मुलांना आमच्या शाळेत घालावे. आपल्या पाल्यांच्या शिक्षणाचा खर्च दुसऱ्या कोणी करावा, अशी अपेक्षा पालक कशी काय ठेवू शकतात? इतकी वर्षे इमानेइतबारे शाळेची फी भरलेल्या; परंतु करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत फी भरू न शकलेल्या पालकांना असा विचारण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.
चालू शैक्षणिक वर्षाची संपूर्ण फी न भरलेल्यांचे मोबाइल क्रमांक व्हॉटस्ऍप ग्रुपमधून काढून टाकण्यात आले आहेत. अनेक विद्यार्थी गेले आठ-पंधरा दिवस ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत. पाल्यांना ऑनलाइन वर्गांमध्ये जोडून घ्यावे. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये. जेवढा खर्च या वर्गासाठी येतो, तेवढीच फी शाळेने घ्यावी. या प्रश्नात आता जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.