…तरच कोथरूडचा खऱ्या अर्थाने कायापालट होईल

पुणे – कोथरूडमधील हजारो सोसायट्यांचा महत्त्वकांक्षी पुनर्विकास प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर कोथरूडचा खऱ्या अर्थाने कायापालट होईल, असा विश्‍वास व्यक्त करत एकविसाव्या शतकातला साजेशा नवीन कोथरूडची निर्मिती करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असा विश्‍वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व महायुतीचे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्‍त केला.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील सोसायट्यांना भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी नागरिकांनी समस्या आणि सूचना मांडल्या. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कोथरूड परिसरातील सोसायट्यांच्या मेळाव्यामध्ये अनेक छोट्या-मोठ्या सोसायट्यांनी पाटील यांना पाठिंबा दर्शविला. यावेळी त्यांनी स्थानिक प्रश्‍नांची माहिती करून घेत, त्यासंदर्भात राज्य सरकारच्या धोरणांच्या माध्यमातून कायमस्वरूपी ठोस तोडगे कसे काढता येतील याबाबत चर्चा केली.

पाटील म्हणाले, कोथरूड परिसरामध्ये सध्याच्या नियमानुसार 9 मीटर किंवा त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवरील सोसायट्यांचा पुनर्विकास शक्‍य आहे. त्यामध्ये बदल करून 6 मीटर रुंदीच्या रस्त्यालगतच्या सोसायट्यांचादेखील देखील पुनर्विकास करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. नागरीकरणाच्या समस्यांवर उत्तम पर्याय म्हणून सोसायटी पुनर्विकास ही योजना महत्त्वाकांक्षी ठरणार आहे.

पुनर्विकासासाठी सोसायट्यांची जागा संपादन करीत असताना त्याच्या मागील सोसायटीबरोबर एकत्रित पुनर्विकास करता येणे शक्‍य आहे काय? तसेच आडवा विस्तार करण्यास मर्यादा असल्याने उभा विस्तार म्हणजेच वाढीव एफएसआय देऊन इमारतींचे मजले वाढवीत विकास करणे शक्‍य आहे काय? त्याच प्रमाणे मुंबईत परळ परिसरामध्ये क्‍लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीचा विकास करण्यात आला आहे. ती योजना कोथरूडमध्ये यशस्वी करता येईल काय, अशा अनेक पर्यायांचा विचार आपण करीत आहोत. त्यासाठी राज्य सरकारची विकासाभिमुख धोरणे राबविताना त्याला स्थानिक प्रशासनाबरोबरच नागरिकांची साथ देखील अतिशय मोलाची आहे. कोथरूड मधील सुजाण सजग आणि सुशिक्षित नागरिक नक्कीच साथ देतील, असा विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केला.

मराठा, गवळी समाजाचा मेळावा
कोथरूड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, विनायक निम्हण यांच्यासह विविध मराठा संस्था संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा आरक्षण लागू करण्याबाबत महायुती सरकारने केलेल्या कामगिरीचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच खासदार संजय काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक शंकर पवार यांनी महाराष्ट्रीय यादव-गवळी समाजाचा मेळाचा आयोजित करून पाटील यांना पाठिंबा दर्शविला. यावेळी शांताराम जाधव, तुकाराम पवार, मंगेश भोसले, संदीप चव्हाण, दत्तात्रय महाडिक, सचिन दोघे, हनुमंत धुमाळ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.