साधनच साध्य

आपल्या दैनंदिन मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी अर्थार्जन अनिवार्य असतं. त्या अनुषंगानं प्रत्येकाच्या जीवनात दोन बाबी अधिकच महत्त्वाच्या ठरतात, एक म्हणजे शिक्षण अर्थात करिअर आणि व्यवसाय. करिअर निवड ही अर्थार्जनाच्या दृष्टिकोनातून निश्‍चितच महत्त्वाची ठरत असते. करिअरची निवड करताना सामजिक भान राखणं देखील महत्त्वाचं असतं. केवळ अर्थार्जन हा एकमेव उद्देश विचारात घेणं योग्य ठरत नाही. अर्थार्जनासाठी कोणकोणते मार्ग अवलंबिले पाहिजेत, हे पाहणेही जरुरीचं असतं. सद्य:स्थितीत योग्य मार्गानं पैसे मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा कमी कष्टांत, कमी वेळेत झटपट श्रीमंत कसं होता येईल, ह्याच दृष्टिकोनातून विचार, वर्तन आणि व्यवहार अनेकांकडून होत असल्याचं दिसून येतं. आपण पैसा कोणत्या मार्गानं मिळवत आहोत, ह्याची जाणीव असणं जरुरीचं नाही का? अगदी श्रमजीवी नाही परंतु बुद्धिजीवी होऊन पैसा मिळवण्याचा प्रयत्न का बरं अशांकडून होत नाही?
पैसा हे साधन आहे, निश्‍चितच ते साध्य असू नये हे जरी सत्य असलं तरीही ते साधन साध्य करण्यासाठी विविध साधनं कशाप्रकारे वापरावीत हे समजून घेणंही सद्य:स्थितीत तितकंच आवश्‍यक आहे. पैशानीच पैसा मिळवला जातो, एका दृष्टिकोनातून ते अगदी खरंही आहे. आपल्या हातात अर्थ आहे तरच आपलं जीवन समर्थ आहे, आयुष्याला अर्थ आहे. पैसा कमवणे, जमवणे तो गमावण्यापेक्षा अधिक कष्टप्रद असतं. पैसा कमवायला, जमवायला खूप वेळ लागतो, त्याच्या तुलनेनं गमवायला काहीच वेळ लागत नाही. गमवलेला पैसा परत मिळवता येऊ शकेलही; परंतु तो कमवण्यासाठी गमवलेला वेळ मात्र परत मिळवता येत नाही. अनेकदा आपण करायला गेलो एक आणि झालं भलतंच, असं होत असतं. आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी, प्रत्येक अनुभव सुखद असण्यासाठी आवश्‍यकता असते ती योग्य प्रकारे पैसा मिळवण्याची. पैशाच्या बाबतीत लोभाचा विचार न करता लाभाचा विचार करणं जरुरीचं असल्याची जाणीव आपल्याला सतत असायला हवी.
साधनांच्या आधीन आणि स्वाधीन
पैसा हे साधन असल्याची जाणीव होणं जरुरीचं असतं; परंतु तो साधन न राहता साध्य होऊ लागतं तेव्हा त्या साधनाच्या आधीन, कालांतरानं स्वाधीन होण्यास प्रारंभ होतो. त्या साधन प्राप्तीसाठी सर्वस्व विसरून जाऊन स्वतःला देखील त्या साधनांच्या स्वाधीन केलं जात असल्याचं विदारक चित्र अनेकदा बघायला मिळत असतं. सुरुवातीला आधीन होणारा तर काहीवेळा लाचार झालेला देखील दिसून येत असतो. त्याच्यासाठी पैसा हे साधन न राहता ते साध्य ठरू लागतं. त्याच्यापुढे आधीन होणं ही आपल्यातील उणीव असू शकते, ह्याची देखील जाणीव अशांना होऊ शकत नसते. स्वाधीन होणारी व्यक्ती इतकी गाफील असते, की त्या व्यक्तीला पैशाची लालसा निर्माण झाल्याचीही जाणीव होत नसते. आधीन होणारी व्यक्ती मुळातच अधीर झालेली असल्याचं स्पष्ट होत असतं. आपल्याला जे साध्य करायचं आहे, ते कधी एकदा आपल्याला प्राप्त होतंय, असं झालेलं असतं.
साधन साधण्यासाठी
साधन साधण्यासाठी निश्‍चितच योग्य मार्ग अवलंबणे महत्त्वाचं असतं. पैसा किती मिळाला, ह्यापेक्षा तो कसा मिळवला ही बाब महत्त्वाची असते. कोणत्याही प्रकारे अवैधरीत्या मिळवलेल्या पैशाचं सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मूल्यमापन कायदेशीररीत्या केलं जात असतं. काहीवेळा हम करे सो कायदा, अशा प्रकारे झुंडशाहीचा, गुंडगिरीचा, दडपशाहीचा वापर करून दबावाच्या तंत्राने मिळवलेला पैसा समाजाला, कायद्याला मान्य नसल्याची देखील जाणीव अनेकांना राहिलेली नसल्याचं दिसून येत असतं. पैसा हे साधन असल्याचं माहिती असूनही ते साधण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडून, बंधनं झुगारून, अनैतिकतेला कवटाळून काहीही करण्यात आपलंच कर्तृत्व श्रेष्ठ असल्याचं दाखवण्याची धडपड सुरू असल्याचं देखील अनेकदा दिसून येत असतं. कोणतंही साधन हे एकप्रकारे माध्यम म्हणूनच काम करत असतं, ह्याची जाणीव का बरं होऊ शकत नाही? हाच कळीचा मुद्दा आहे.
साधनातून सधनता
आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी पैसा हेच साधन असतं. त्या साधनाशिवाय आपल्या गरजा भागवणे अशक्‍य असतं. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या तीन गरजांप्रमाणे अर्थार्जन ही देखील अत्यंत महत्त्वाची गरज असल्याचं आपण प्रत्येकजण जाणतो. अर्थार्जन करणे म्हणजेच पैसा मिळवणे, साधनाची प्राप्ती करणे होय. ह्या साधनातून सधनता देखील प्राप्त करणं सद्य:स्थितीत जरुरीचं झालं आहे. वर्तमानातील आपल्या गरजा भागवणे जसं जरुरीचं असतं, तसंच नजीकच्या भविष्याची देखील आर्थिक पातळीवर तरतूद करणं गरजेचं असतं. साधनाच्या माध्यमातून सधनता प्राप्त होणं ही निश्‍चितच काळाची गरज आहे. पण साधनच साध्य समजणाऱ्या व्यक्तीला त्याची जाणीव राहात नाही. साधन प्राप्तीमध्ये साधक आणि बाधक काय हे जाणून न घेण्याचीच उणीव त्यांच्यामध्ये असल्याचं दिसून येत असतं.
साधनामुळे संधिसाधू
साधनाला साध्य समजणारे हे दुसरे तिसरे कोणीही नसून ते केवळ संधिसाधू असल्याचं अनेकदा स्पष्ट होत असतं. साधन प्राप्तीचा फायदा मिळवणे आणि प्राप्त परिस्थितीचा गैरफायदा घेणं ह्यातला फरक न समजण्याचीच उणीव अशा संधीसाधूंमध्ये असल्याचं अनेकदा दिसून येत असतं. पैसा मिळवण्याची प्रत्येक संधी मिळवणे, त्या संधीचं सोनं करणं हे निश्‍चितच योग्य ठरू शकतं, परंतु एखाद्याचं नुकसान करून, फसवणूक करून, दबावतंत्राचा वापर करून पैसा मिळवणं कुकर्तृत्वाचं लक्षण मानावं लागेल. ह्या संधीसाधूंमध्ये सर्व प्रकारची कामं करणारे दलाल, अडवणूक करून पैसा उकळणारे, हर तऱ्हेच्या कामासाठी वारेमाप पैसा उकळून स्वतःचं उखळ पांढरे करणारे काही संख्येनं कमी नाहीत. आर्थिक, मानसिक, शारीरिक, कौटुंबिक पातळीवर पिडलेल्या, अडलेल्यांना अंधश्रद्धेच्या भूलथापांची भुरळ पाडून आपल्या मोहजालात ओढणारे आणि साधनाला साध्य करण्यासाठी आर्थिक पिळवणूक करणारे संधिसाधू देखील संख्येनं कमी नाहीत, पण सर्वसाधारण सुज्ञ व्यक्तीला होणाऱ्या फसवणुकीची जाणीव का बरं त्यावेळी होत नसेल?
सधनता साधताना
आपल्या सधनतेचा गैरफायदा तर कोणी घेत नाही ना? ह्याची जाणीव प्रत्येकाला असतेच; परंतु तरीदेखील भावनिक पातळीवर मैत्रीचे, नात्याचे, प्रेमाचे संबंध प्रस्थापित करून आर्थिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक, कौटुंबिक बाबतीत इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्याच्या घटना देखील अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात उघड होत चालल्या आहेत. आर्थिक व्यवहार होत राहतो तोपर्यंत “तेरी बी चूप आणि मेरी बी चूप’ अशी परिस्थिती असते. कालांतराने व्यवहार खंडित झाला की, इमोशनल ब्लॅकमेलिंग सुरू होतं. ह्याबाबतीत संबंधिताचा हेतू झटपट श्रीमंत होऊन सधनता साधण्याचा असल्याचं का समजू शकत नाही? इमोशनल ब्लॅकमेलिंग होण्याची वेळ का बरं येऊ दिली जाते? ह्या प्रकारे जेव्हा गैरफायदा घेतला जातो तेव्हा काहीअंशी चुकीच्या गोष्टी घडल्या असण्याची शक्‍यता असते. का बरं त्याचीसुद्धा जाणीव होत नाही? इमोशनमध्ये आडकायला असं काय भाग पाडत असतं? आपली इमोशन्स आपल्या उणिवा का बरं ठरतात? दिवसेंदिवस वाढत चाललेल्या इमोशनल ब्लॅकमेलिंगच्या समस्येचा गांभीर्याने विचार होणं जरुरीचं आहे.
साधनच साध्य
सद्य:स्थितीत सोशल मीडिया, स्मार्ट फोन, मोबाइल नेटवर्क ह्यामुळे जनसंपर्क खूपच जलद होऊ लागला आहे. तंत्रज्ञान, संगणकीकरण, आधुनिकीकरण ह्याचा परिणाम जनमानसावर प्रचंड प्रमाणात झाला आहे. ह्याचा जितका उपयोग, फायदा होऊ लागला आहे, तितकाच त्याचा तोटा, नुकसान, फसवणूक होण्याचं प्रमाणही खूपच वाढत चाललं असल्याचं आपण अनुभवत आहोत. ह्या फसवणुकीच्या घटनांमुळे आपल्यापैकी किती जण सावध होतात? किती सतर्क राहतात? सुशिक्षित व्यक्तीच ह्यामध्ये मोठ्या रकमेच्या फसवणुकीच्या बळी पडल्याच्या घटना का बरं सतत घडत राहतात? झटपट श्रीमंती हा त्या घटनांच्या मागील उद्देश असतो का? ह्यात बळी पडलेली आणि फसवणूक करणारी व्यक्ती परिणामांची जाणीव करून घेऊ शकत नाही का? की जाणीव न होणं हीच त्यांच्यात उणीव असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत असूनही आपण सावध न झाल्यामुळे सावज होत आहोत, त्याचे बळी पडत आहोत. फेसबुकच्या माधमातून मैत्री करून आर्थिक फसवणूक, प्रत्यक्ष भेटून मानसिक आणि शारीरिक शोषण, अत्याचार घडत असल्याचं सातत्याने आपण ऐकत, वाचत असतो. काहीवेळा तर काही जणांना स्वतःचा जीवदेखील गमवावा लागल्याचं उघड झालं आहे. फसवणूक होण्याइतके आपण अज्ञानी असतो का? कशाचीच जाणीव का होत नाही अशावेळी?

आपल्या साधनालाच आपलं साध्य समजू लागलेल्या प्रत्येकाचा विचार, वर्तन आणि व्यवहार अभ्यासला तर असं लक्षांत येईल की, केवळ पैसा मिळवणं हेच उद्दिष्ट त्यांचं असतं. तो कोणत्या मार्गानं, कोणत्या पद्धतीनं, किती हुशारीनं, कष्टानं, किती इमानदारीनं मिळवला ह्याकडे दुर्लक्ष होऊ लागल्याचं खेदजनक चित्र अनेक ठिकाणी अनेकांच्या बाबतीत दिसून येत असतं. आपल्याला काय आणि किती हवंय ह्याची देखील जाणीव असणं जरुरीचं असतं. भूक आहे तेवढं खाणं ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणं ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही संस्कृती. ह्याही पलीकडे जाऊन जी तयार होत असते, ती कलाकृती. ज्यामध्ये अशा व्यक्तीचा आकृतिबंध चारचौघांपेक्षा निराळा असतो, ते त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व असतं, ज्यात अत्यंत निराळे विचार, वर्तन आणि व्यवहार सामावलेले असतात; ते त्या व्यक्तीच्या व्यक्त होण्यातून दिसत असतात.

प्रा. शैलेश कुलकर्णी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)