जागरुकतेचा अभाव : लागण झालेल्यांमध्ये 40 टक्के तरुण
पिंपरी – करोना विषाणूचा सर्वाधिक धोका असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे बाधित होण्याचे प्रमाण फक्त 10.06 टक्के इतके आहे. तुलनेत तरुणांमध्ये मात्र या आजाराचा संसर्ग वेगाने पसरत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. तब्बल 40.22 टक्के तरुणांना करोनाची आत्तापर्यंत लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तरुणांमध्ये याबाबत जागरुकता वाढविणे खूपच गरजेचे आहे.
महापालिका प्रशासनाकडून बुधवार (दि. 13) सायंकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 179 रुग्ण करोनाबाधित आहेत. त्यातील 116 रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर, 4 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. रुग्णालयामध्ये सध्या 59 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 50 रुग्ण हे कोणत्याही प्रकारची लक्षणे नसणारे आहेत. मात्र, त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 8 रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे आढळली. तर, 1 रुग्ण अत्यवस्थ आहे.
शहरात आत्तापर्यंत लागण झालेल्या 179 रुग्णांमध्ये ज्येष्ठ नागरिक केवळ 18 आहेत. ही बाब दिलासादायक आहे. टक्केवारीत हे प्रमाण फक्त 10.06 टक्के इतके आहे. तुलनेत 22 ते 39 या वयोगटातील 72 तरुण करोनाबाधित झाले. टक्केवारीत हे प्रमाण तब्बल 40.22 टक्के इतके आहे. त्यामुळे ही बाब चिंताजनक आहे. तर, शहरामध्ये लहान बाळांपासून ते 40 वर्षांच्या आतील रुग्णांची एकूण संख्या 123 इतकी आहे. टक्केवारीत हे प्रमाण 68.71 टक्क्यांपर्यंत पोहचले आहे.
पुरुष रुग्णांचे प्रमाण जास्त
करोना बाधितांमध्ये पुरुष रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. आत्तापर्यंत करोनाची लागण झालेल्या 179 रुग्णांमध्ये सर्वाधिक 110 पुरुष रुग्ण आढळले. टक्केवारीत हे प्रमाण 61.45 टक्के इतके आहे. तर, 69 महिला रुग्णांना करोनाची लागण झाली. टक्केवारीतील प्रमाण 38.55 टक्के इतके आहे.