ई श्रीधरन यांच्या नावावरून भाजपचे ‘घुमजाव’; प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

थिरूवनंतपुरम – केरळातील भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून 88 वर्षीय मेट्रो मॅन ई श्रीधरन यांच्या नावाची घोषणा काल प्रदेशाध्यक्ष के.सुरेंद्र यांनी केल्याचे वृत्त सर्वत्र प्रसिद्ध आहे, तथापि आज या घोषणेविषयी स्वत: सुरेंद्र यांनीच घुमजाव केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ई श्रीधरन हे केरळचे मुख्यमंत्री व्हावेत अशी जनतेची इच्छा असल्याचे काल मी म्हणालो होतो. तथापि याचा अर्थ त्यांना पक्षाने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केले आहे असा होत नाही.

पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार पक्षाच्या मध्यवर्ती नेतृत्वाकडून जाहींर होतो. ई श्रीधरन हेच केरळचे मुख्यमंत्री व्हावेत ही राज्यातील जनतेची व पक्ष कार्यकर्त्यांची इच्छा आहे एवढेच मी काल बोललो होतो. पण मी त्यांना भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलेले नाही.

माझ्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केला. श्रीधरन यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून कॉंग्रेस व कम्युनिस्टांमध्ये पोटशुळ उठला आहे असा आरोपही त्यांनी केला. काल थिरूवल्ला येथे बोलताना के.सुरेंद्र यांनी ई श्रीधरन यांचे कौतुक करताना ते मुख्यमंत्री झाले तर केरळचा विकास दहापटीने वाढले असा दावा केला होता.

दरम्यान केंद्रीय मंत्री मुरलीधरन यांनीही काल एक ट्विट करीत मेट्रोमॅन श्रीधरन यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार घोषित केले असल्याचे म्हटले होते. पण त्यांनी हे ट्विट नंतर डिलिट केले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

मुरलीधरन यांनी प्रदेश भाजप अध्यक्षांकडे त्यांच्या वक्तव्याविषयी विचारणा केली असता ते म्हणाले की श्रीधरन यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित केले जावे अशी केवळ मागणी केली. या पदासाठी मी त्यांचे नाव घोषित केलेले नाहीं. त्यांच्या या दाव्यानंतर मुरलीधरन यांनी आपले ट्विट मागे घेतले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.