ST Bus News – राज्यात सार्वजनिक वाहतूक म्हणून बस ही महत्त्वाची प्रवासी सेवा आहे. मेट्रो शहरातील कानाकोपऱ्यात जाण्यासाठी बस हा एक महत्त्वाची सार्वजनिक व्यवस्था आहे. याबाबत करण्यात आलेल्या एका सर्व्हेमध्ये समोर आले की, राज्यात एक लाख प्रवाशांसाठी फक्त 60 बस गाड्या असून राज्यात तब्बल 24 हजार बसगाड्यांचा तुटवडा आहे.
सार्वजनिक वाहतुकीचा अभ्यास करणारी जागतिक संस्था इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसीने (आयटीडीपी) केलेल्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे. मुंबईच नव्हेतर महानगर प्रदेश आणि उर्वरित शहरी शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुक सेवेचे तीनतेरा वाजल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सर्व्हेनुसार, मुंबईसह एमएमआरमध्ये बेस्ट बसेस धावतात. या ठिकाणी 15,600 बसेसची आवश्यकता आहे. मार्च 2022 पर्यंत विविध बस वाहतूक उपक्रमांकडे फक्त 4,688 बसेस उपलब्ध होत्या. त्यामुळे राज्यभर शहरी बस सेवांचा विस्तार करण्याची तातडीची गरज असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळद्वारे चालवल्या जाणाऱ्या 1 हजार बसेस ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, मीरा-भाईंदर या शहरात चालवल्या जातात.
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पासाठी सज्ज होत असताना एका गंभीर मुद्द्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे, राज्यातील 44 पैकी 30 शहरांमध्ये औपचारिक शहरी बस सेवांचा अभाव आहे. तसेच, सार्वजनिक वाहतूक असलेल्या 14 शहरांमध्येही सेवा मूलभूत निकषांपेक्षा खूपच कमी आहेत. महाराष्ट्राच्या नवीन सरकारने आगामी अर्थसंकल्पात बस गाड्यांना प्राधान्य देणे, अत्यंत महत्त्वाचे आहे, असे आयटीडीपी इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्वथी दिलीप यांनी सांगितले.
पर्यावरणावर सकारात्मक परिणाम
बससेवा नसलेल्या 44 शहरांना किमान 24 हजार नवीन बस गाड्यांची आवश्यकता आहे. यामुळे शहरी भागात लक्षणीय सुधारणा होण्यासोबतच पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवर अनेक सकारात्मक परिणाम होऊ शकतात. तसेच रस्त्यांवरून दररोज 19 लाख चारचाकी आणि 30 लाख दुचाकी वाहने कमी होऊ शकतात.
यामुळे वाहतुक कोंडी, प्रदुषण कमी करण्यास मोठा हातभार लागेल, असे आयटीडीपी इंडियाच्या ट्रान्सपोर्ट सिस्टम्स अँड इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या प्रोग्राम मॅनेजर वैशाली सिंग यांनी माहिती दिली. तसेच सर्व्हेत सातत्य राखण्यासाठी पुण्यातील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टच्या मार्च 2022 च्या अहवालामधील डेटा वापरला आहे.