टाकळी हाजी विभागात 22 गावांमध्ये फक्‍त सहा वायरमन

सविंदणे -टाकळी हाजी महावितरण उपकेंद्र विभागामध्ये बेट भागातील 22 गावे असून या गावांना मिळून फक्त सहा वायरमन कार्यरत असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून अनेक रात्री अंधारात काढाव्या लागत आहेत.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. दिवसातून अनेकवेळा तांत्रिक बिघाड होऊन बत्ती गुल होत आहे. गावामध्ये वायरमन नसल्याने नागरिकांना टाकळी हाजी उपकेंद्रात फोन करावा लागतो. वायरमन उपलब्ध झाल्यावरच उशिरा दुरुस्तीचे काम होते. या भागामध्ये बऱ्याच वेळा विद्युत रोहित्र जळाल्यावर महिनाभर बदलून मिळत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना पैसे गोळा करून स्वखर्चाने ट्रान्सफार्मर केडगाव-चौफुला येथून आणावा लागतो. तसेच वीजपुरवठा खंडित दिवसांचे पण लाईटबिल हे शेतकऱ्यांना भरावेच लागते. कारण रीडिंगप्रमाणे शेतकऱ्यांना बिल येतच नाही. जास्त येणारे लाईट बिल न भरल्यास शेतकऱ्यांचे कनेक्‍शन तोडले जाते. विद्युत रोहित्र बंद असो वा नसो बिल हे येतच आहे. प्रत्येक गावामध्ये वायरमन कार्यरत झाल्यास ग्राहकांच्या अडचणी तत्काळ सुटून वीजचोरी रोखली जाईल. त्यासाठी शासनाने लवकरात लवकर रिकाम्या जागेवर वायरमनची भरती करून नियुक्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

टाकळी हाजी उपकेंद्रात 22 गावांना मिळून सहा वायरमन असल्याने काम करण्यास अडचणी निर्माण होत आहे. थोड्याच दिवसांत वायरमनची भरती असून वायरमन उपलब्ध होतील.
-दीपक पाचुंदकर, कनिष्ठ अभियंता महावितरण


ग्रामीण भागातील विद्युत रोहित्र जळाल्यास 72 तासांच्या आत महावितरणने विनाशुल्क वाहतूक करून बदलून देणे बंधनकारक आहे. तसेच 72 तासांनंतर विद्युत रोहित्र बदलून न दिल्यास मीटरधारकाने तक्रार केल्यास जेवढा विलंब होईल त्याप्रमाणे प्रतितास पन्नास रुपयेप्रमाणे महावितरणला दंड करण्यात येतो. त्यासाठी ग्राहकाने विद्युत बिल भरलेले आवश्‍यक आहे. महावितरण विरुद्ध अशा प्रकारच्या तक्रारी असल्यास बारामती परिमंडल व पुणे परिमंडल यांच्या ग्राहक तक्रार निवारण मंच यांच्याकडे व ग्राहक न्यायालय पुणे यांच्याकडे करण्यात याव्यात.
-अशोक भोरडे, अध्यक्ष पुणे जिल्हा ग्राहक पंचायत

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.