पेपर फुटल्याची केवळ अफवा; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई – मुंबईत बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली होती. काही विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये प्रश्नपत्रिका आढळली असून ते परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचले होते. त्यानंतर विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक केली. मात्र, रसायनशात्राचा पेपर फुटला नसून ती केवळ अफवा आहे, असे स्पष्टीकरण शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.
इयत्ता बारावीची प्रश्नपत्रिका एसएससी बोर्डाच्या नियमानुसार 10 मिनिटे अगोदर म्हणजे 10.20 वा. प्रश्नपत्रिका वाचनासाठी वाटप करण्यात येते व प्रत्यक्ष उत्तरपत्रिका लिखाण 10.30 वाजता सुरू करण्यास सांगितले जाते. विले-पार्ले केंद्रावर एका विद्यार्थीनीच्या मोबाईलवर 10.24 वा. प्रश्नपत्रिकेतील काही भाग आढळून आला. या विद्यार्थीनीच्या मोबाईलमधील प्रश्नपत्रिकेच्या भागाची छाननी केली असता व्हॉट्सऍपद्वारे काही भाग प्राप्त झाल्याचे दिसून आले.
याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सखोल तपास करत आहेत. अध्यक्ष, एसएससी बोर्ड यांनी केलेल्या चौकशीनुसार विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटप केल्यानंतर म्हणजेच 10.20 वा. नंतर मोबाईलवर आढळलेली आहे.
त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटलेली नसून प्रश्नपत्रिकेचा काही भाग प्रश्नपत्रिका वाटप झाल्यानंतर व्हॉट्सऍपद्वारे प्रसारित झाल्याचे दिसून येते. त्यामुळे रसायनयशास्त्र विषयाचा पेपर फुटला या बातमीमध्ये तथ्य नसल्याचे वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत सांगितले.





