मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याच्या सांगण्यात येत होते मात्र आता या वृत्तावर मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच खुलासा करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या भेटीची बातमी निव्वळ अफवा असल्याचे कार्यालयामार्फत सांगण्यात आले आहे. मंगळवारी रात्री शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिलव्हर ओक’ या निवासस्थानी ही भेट झाल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळामध्ये तर्क वितर्कांना उधाण आले होते. मात्र आता शिंदे यांच्या कार्यालयाकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देताना ही भेट झालीच नसल्याचे सांगण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशनामध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर राज्यातील प्रमुख नेत्यांची आपण भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.याच पार्श्वभूमीवर ही अफवा पसरवण्यात आल्याचे सांगितलं जात आहे. काही वृत्तवाहिन्यांनी शिंदे आणि पवार यांच्या जुन्या फोट्याच्या आधारावर रात्री उशीरा हा दोन्ही नेत्यांची सिव्हर ओकवर भेट झाल्याच्या बातम्या दिल्या होत्या. मात्र अशाप्रकारची कुठलीही भेट झालेली नाही असे मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
शरद पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी भाजपा व एकनाथ शिंदे गटाचे सरकार लवकरच कोसळेल आणि विधानसभेची मध्यावधी निवडणूक होईल, असे भाकीत केले होते. त्यानंतर शिंदे यांनी पवारांची घेतलेली ही भेट चर्चेचा विषय ठरली असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.