इतर कंपन्यांच्या पाणी बॉटल विकण्यास मनाई
प्रवाशांना स्वस्तात मिळणार शुद्ध पाणी
पुणे – रेल्वे स्थानक परिसरात “रेल नीर’व्यतिरिक्त अन्य खासगी कंपनीच्या पाण्याच्या बॉटल विकण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे. तर रेल्वे स्थानक आणि गाड्यांमध्ये 1 लिटर पाण्याची सीलबंद बॉटल केवळ 15 रुपयांना विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून विक्रेत्यांना आदेश देण्यात आले असून तपासणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
पुणे स्टेशनवर दैनंदिन प्रवास करण्याऱ्यांची संख्या सुमारे दोन लाखांच्या आसपास आहे. अनेकदा प्रवासी स्थानक परिसरात पाण्याची खरेदी करतात. अनेकदा पाण्याच्या बाटल्या विकताना गैरप्रकार केले जातात. परंतु, आता स्टेशन परिसरात एकाच ब्रॅन्डचे पाणी विकण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे. यानुसार स्टेशन परिसरात “रेल नीर’ हे रेल्व केटरिंग कंपनीच्या पाणी बॉटल विकण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.
या मोहिमेअंतर्गत रेल्वेच्या अधिकारी आणि निरीक्षकांचे पथक मंडल रेल्वे प्रबंधक मिलिंद देऊस्कर, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, मंडल वाणिज्य प्रबंधक सुरेशचंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे गाड्या आणि स्थानक परिसरामध्ये पाहणी करणार आहेत.
इतर कंपन्यांना मुदत
पुणे स्थानकासह अन्य विभागामध्ये “रेल नीर’ उपलब्धता कमी असल्यास अन्य खासगी कंपनीच्या पाण्याच्या बाटल्यांची विक्री करण्यास मान्यता देण्यात आली आहे. “ऑक्सीमोअर’ कंपनीला दि. 14 सप्टेंबरपर्यंत, “गेलन्स’ आणि “पंपअप एक्वा’ कंपनीला दि. 19 सप्टेंबरपर्यंत तर “एक्वाफिना’, “हेल्थप्लस’ कंपनीला दि. 20 नोव्हेंबरपर्यंत सीलबंद पाण्याची बाटली विकण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.