पंतप्रधानांच्या इच्छाशक्तीमुळेच दहशतवाद्यांवर #AirStrike शक्य : राम माधव

भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते राम माधव यांनी आज भारतीय वायुसेनेद्वारे पाकव्याप्त काश्मिरातील जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या प्रशिक्षण तळावर केलेल्या हवाई हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. राम माधव भारतीय वायुसेनेच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत बोलताना म्हणाले की, “भारताची धुरा सुरक्षित हातांमध्ये असून आज पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवादी तळावर करण्यात आलेला हवाई हल्ला पंतप्रधानांच्या दहशतवादाविरोधी इच्छाशक्तीचेच दर्शन घडवतो. पंतप्रधानांनी स्वतः हा हल्ला कधी करावा याबाबत निर्णय घेतला असून हा हल्ला करताना जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा बारगळणार नाही याची देखील विशेष काळजी घेण्यात आली आहे.”

तत्पूर्वी पुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या जवानांवर पाकिस्तानपुरस्कृत जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला होता. आज पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रतिउत्तर देत भारतीय वायुसेनेतर्फे पाकव्याप्त काश्मिरात हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या ३००हुन अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याचे वृत्त आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.