#WTC21 | कसोटी स्पेशालिस्टच हवेत – कोहली

कोहलीने स्वतःच्या अपयशानंतरही पुजारा, रहाणेलाच दिला दोष

साउदम्पटन – जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने संताप व्यक्‍त केला आहे. त्याने वैयक्‍तिक कामगिरीवर भाष्य न करता केवळ संघातील अन्य फलंदाजांना दोषी ठरवले आहे. तसेच यापुढील काळात जे खेळाडू कसोटी स्पेशालिस्ट मानले जातात अशांचीच निवड कसोटी संघात व्हावी, अशी अपेक्षाही त्याने व्यक्‍त करताना टीकेचा चेंडू निवड समितीकडे टोलवला आहे.

संघातील काही फलंदाज हे धावाच करत नाहीत हे गेल्या काही कसोटी सामन्यांतूनही दिसून आले आहे. जर त्यांच्याकडे कसोटी क्रिकेटसाठी आवश्‍यक मानसिकता आहे तर त्यांनीच धावा करायला पाहिजेत. कसोटी संघात अनेक बदल व्हावेत अशी अपेक्षा आहे. सलामीवीर अपयशी ठरल्यावर त्यानंतरच्या फलंदाजांनी जबाबदारी घेत खेळ केला पाहिजे.

या सामन्यात मात्र असे एकदाही दिसले नाही. जे फलंदाज कसोटीसाठी भारतीय संघात निवडले जातात त्यांनी त्यांची जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे, असे सांगताना कोहलीने चेतेश्‍वर पुजारा व अजिंक्‍य रहाणे यांनाच जणू इशारा दिला आहे.

या पराभवानंतर आता आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. ऑगस्ट महिन्यात इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडूला सराव सत्रात आपल्या चुका दुरुस्त करण्यावर भर द्यावा लागणार आहे. संघ मजबूत करण्यासाठी काय करावे लागेल, याचाही विचार आम्ही करणार आहोत. मर्यादित षटकांच्या भारतीय संघाप्रमाणे कसोटी संघही बलाढ्य होईल यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही कोहलीने सांगितले. कसोटी क्रिकेटच्या 144 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या विजेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळेच कोहलीने संताप व्यक्‍त केला आहे.

पुजाराचे अपयश हीच चिंता

राहुल द्रविडचा वारसदार अशी ख्याती मिळवलेल्या चेतेश्‍वर पुजाराचे अपयश हीच सध्या भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरली आहे. जवळपास दोन वर्षे त्याला शतकी खेळी करता आलेली नाही. 2018 साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात त्याने शतकी खेळी केली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात पहिल्या डावात तब्बल 54 चेंडूत त्याने केवळ 8 धावा केल्या. त्यातही पहिली धाव घेण्यासाठी पुजाराने 35 चेंडू घेतले, तर दुसऱ्या डावात 80 चेंडूत 15 धावा केल्या. त्यामुळेच कोहलीच्या टीकेचा रोख पुजारावरच असून, त्याचे संघातील स्थानही धोक्‍यात आल्याचे संकेत मिळत आहेत.

स्वतःचे अपयश झाकले

कोहलीने संघातील रोहित शर्मा, अजिंक्‍य रहाणे व चेतेश्‍वर पुजारा यांचा नामोल्लेख टाळून टीका केली. मात्र, गेल्या दीड वर्षापासून खुद्द कोहलीचीच कामगिरी अत्यंत सुमार होत असूनही त्याने त्यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. संघातील प्रमुख फलंदाजांनी जबाबदारीने खेळणे गरजेचे असल्याचे सांगताना आपल्या बॅटमधूनही धावा निघाल्या नाहीत हे सांगायलाही तो विसरला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.