प्लॅस्टिक कारवाईचा केवळ “फार्स’

“प्लॅस्टिक विरोधी दिना’ पुरतीच राहिली मर्यादित


एकाच दिवशी 585 जणांना दंड


मार्च ते जून या चार महिन्यांत केवळ 814 जणांवर कारवाई

पुणे – प्लॅस्टिकवरील कारवाई केवळ “प्लॅस्टिक विरोधी दिना’पुरतीच मर्यादित राहिल्याचे एकूण आकडेवारीवरून दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी दिवसाला शेकडा कारवाई करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले घनकचरा व्यवस्थापन विभाग या विषयात अक्षरश: ढेपाळल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई तुंबण्याचे प्रमुख कारण प्लॅस्टिकचा कचरा आहे. पुण्यातही तसे होऊ नये यासाठी प्लॅस्टिकवर कारवाई करणे आवश्‍यक आहे. ही केवळ पावसाळ्यातील बाब असली तरी प्लॅस्टिक वापरावर बंदी आहेच त्यामुळे रोजच्या रोज त्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, अन्य दिनी कारवाई करण्यात महापालिका उदासीन असल्याचे एकूण आकडेवारीवरून दिसून येत आहे.

महापालिकेत घनकचरा व्यवस्थापन कार्यालयांतर्गत 15 क्षेत्रीय कार्यक्षेत्रात 3 जुलै रोजी “प्लॅस्टिक विरोधी दिन’ साजरा करण्यात आला. या दिवशी स्वतंत्र पथक नेमून कारवाई करण्यात आली. त्यामध्ये मोकादम, आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, उपआरोग्य निरीक्षक, विभागीय वैद्यकीय अधिकारी, महापालिका सहायक आयुक्‍त आदी सहभागी झाले होते. या दिवशी प्लॅस्टिक वापरणाऱ्या 585 नागरिकांवर कारवाई करण्यात आली. त्यातून 1 लाख 99 हजार 670 रुपयांचा दंड जमा झाला. यातून 286 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे.

1 दिवसात एवढी मोठी कारवाई करण्यात आली आहे. मात्र, मार्च ते जूनपर्यंत म्हणजे चार महिन्यांत महापालिकेने केवळ 814 जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 11 लाख 28 हजार 150 रुपयांचा दंड आकारला आहे आणि 4,331 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. 1 दिवसात केलेली कारवाई आणि 4 महिन्यांत केलेली कारवाई यांची तुलना करता महापालिका प्रशासनाची 4 महिन्यांतील कारवाई ढेपाळल्याचे दिसून येते.

“स्वच्छ भारत मिशन’मध्ये नंबर घसरल्यानंतर वर्षभर आधीपासूनच महापालिकेने तयारी सुरू केली होती. मात्र, तो केवळ फार्सच ठरल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. एका दिवसातील कारवाईचा वेग जर रोज पाहिला तर सहा महिन्यांतच प्लॅस्टिक बंदीचे परिणाम दिसले असते. परंतु, तसे झाले नाही. आजही रस्त्यांवर सर्रास प्लॅस्टिक पिशव्या वापरल्या जातात आणि दुकानदारांकडूनही त्या विकल्या जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.