करोना चाचणी केली तरच दुकाने उघडा; ‘या’ ग्रामपंचायतीचा व्यापाऱ्यांसाठी फतवा

हिंजवडी – करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दररोज वाढत असल्याने ही चेन ब्रेक करण्यासाठी माण ग्रामपंचायतीने कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. माणच्या हद्दीत सुरू असलेल्या दुकानदारांना कोविड टेस्ट करून घेणे बंधनकारक असल्याचा आदेश काढत ती टेस्ट निगेटिव्ह आली तरच दुकान निर्धारित वेळेत सुरू ठेवता येईल. अन्यथा कारवाई करण्यात येईल.

करोना चाचणी रिपोर्ट नसणाऱ्या व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवल्यास दंडात्मक व दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात येईल, असा फतवा वजा आदेश माण ग्रामपंचायतीने काढला असल्याची माहिती माणच्या सरपंच अर्चना आढाव व उपसरपंच प्रदीप पारखी यांनी दिली. याबाबतची दवंडी गावात देण्यात आली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गावातील करोना संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी माण ग्रामपंचायतीने तालुक्‍याचे सभापती पांडुरंग ओझरकर व गटविकास अधिकारी संदीप जठार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पांडुरंग राक्षे, विस्तार अधिकारी एस. डी. जाधव, ग्रामविकास अधिकारी बी. आर. पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदीप साठे, रवी बोडके, देविदास सावंत, शशिकांत धुमाळ, पंडित गवारे, यशराज पारखी, सचिन आढाव, नवनाथ पारखी, राम गवारे, नाना कोळी, शिवाजी भिलारे, महेश पारखी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मायदेवी गुजर यांच्यासह आरोग्य व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी आयटी पार्कमधील इन्फोसिस कंपनीच्या मदतीने माणवासीयांसाठी कोविड केअर सेंटर प्रस्ताव तयार करण्यात आला. तसेच वॉर्डनिहाय तपासणी मोहीम व रुग्णांची यादी तयार करण्याची जबाबदारी प्रत्येक सदस्यांवर सोपविण्यात आली. पारखी वस्तीवरील कै. बबन नाना पारखी व्यायाम शाळेत स्वब टेस्ट केंद्र सुरू करण्याचे ठरले. त्यास गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी त्वरित मान्यता दिली.

माण गावात इन्फोसिसच्या सहकार्याने कोविड रुग्णांसाठी अद्ययावत ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर सुविधा असणारे कोविड सेंटर किंवा रुग्णालय तयार करण्याचा मानस असून, उद्या ग्रामपंचायतीचे शिष्टमंडळ इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांशी याबाबत सविस्तरपणे चर्चा करणार आहे.
– पांडुरंग ओझरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, मुळशी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.