पिंपळे गुरव, (वार्ताहर) – पिंपळे गुरव, नवी सांगवी आणखी स्मार्ट होण्यासाठी महापालिका प्रयत्न तसेच नवनवीन प्रयोग करत आहे. परंतु या स्मार्ट परिसरात ठिकठिकाणी कचरा दिसून येतो. विशेष म्हणजे कचरा टाकणारेच परिसरात कचरा होत असल्याची तक्रार करत आहेत.
रस्त्यावर कचरा येतो कुठून, तो टाकतो कोण? तो तयार कसा होतो? अशा प्रश्नांची उत्तरे नागरिकांनाच शोधावी लागणार आहेत. नागरिकांमध्ये सुधारणा झाल्याशिवाय परिसर स्मार्ट होणार नाही, हे निश्चित.
अनेकदा नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते येथील परिसरातील कचरा समस्येबाबत वारंवार महापालिकेला दोष देत असतात. मात्र नागरिकच हा कचरा घरातून, दुकानातून आणि हाॅटेलमधून आणून उघड्यावर टाकतात.
प्रत्येकाच्या दारात, घरासमोर, सोसायटीच्या आवारात, मुख्य रस्त्यांवर, अंतर्गत रस्त्यांवर कचऱ्याची घंटा गाडी दररोज वेळेत येत असते. ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून घंटा गाडीत टाकणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. याबाबत महापालिका कोट्यवधी खर्च करून सातत्याने जनजागृती करीत आहे.
घरापासून थोड्या अंतरावर नेऊन कचरा टाकायचा, खाद्य पदार्थ, पेय यांचे रॅपर, पॅकींग आणि बाटल्या कुठेही टाकून द्यायच्या. रस्त्यात, भर चौकात, चहाच्या टपऱ्यांसमोर थुंकायचे हे प्रकार अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत.
विशेषत: गुटखा खाणारी मंडळी आधी थुंकून परिसर घाण करतात आणि नंतर चहा प्यायचा असेल अथवा काही खायचे असेल तर किमान लिटर-दोन लिटर पाण्याने खूपच किळसवाण्या पद्धतीने गुळण्या करतात. हे सर्व काही रेस्टाॅरेंट आणि चहाच्या टपरीसमोर उघड्यावर सुरु असते.
इंदौर सारख्या शहराचा ‘स्वच्छ भारत अभियानात’ प्रम क्रमांकावर आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे तेथील सुजाण नागरिक ! हे नागरिक आपला कचरा आपल्या घरात, अवतीभवती जिरवता येईल तेवढा जिरवतात.
घंटा गाडी आल्यावर ओला, सुका कचरा विलगिकरण करून टाकत असतात. बागेतील, परिसरात, रस्त्याच्या कडेला पडलेला झाडांचा पालापाचोळा गोळा करून त्याचे खत तयार करून तेच झाडांना घालतात.
रस्त्यावर बागेत फिरताना कुठेही कचरा टाकला जात नाही. कुठेही थुंकताना दिसत नाहीत. याची पुनरावृत्ती सांगवी, पिंपळे गुरव परिसरात सर्वांच्या सहकार्याने झाली तर आणि तरच आपला परिसर स्मार्ट व्हायला वेळ लागणार नाही. हेही तितकेच खरे आहे.
आपण हे करू शकतो
आपल्या भागात महापालिकेची घंटा गाडी आली नाही तर आपण तक्रार करू शकता.
रस्त्यावर कचरा टाकताना दिसल्यास त्या नागरिकांना रस्त्यावर कचरा न टाकण्याचे आवाहन करावे. चाकरमानी नागरिकांनी आपला कचरा घरात साठवून सुट्टीच्या दिवशी तो कचरा गाडीत टाकावा.
परस्परविरोधी दृश्ये
अनेकदा खासगी मोकळ्या जागेत, मिलिटरी परिसरात सीमा सुरक्षा लगत बांधण्यात आलेल्या तारेच्या कुंपणावर, रस्त्याच्या कडेला, पदपथावर नागरिक सर्रास कचरा टाकत आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तो कसा काढायचा? भगतसिंग चौक, कासारवाडी – पिंपळे गुरव पूल, राजीव गांधी वसाहत, मोरया पार्क, एच पी गॅस गोडाऊन, लक्ष्मी नगर, साठ फुटी रोड, शिवराम नगर, काटेपुरम बॅडमिंटन हॉल शेजारील मोकळे मैदान,
मयूर नगरी, पी डब्ल्यू डी मैदान, आदी परिसरात कचऱ्याचे ढिगारे रस्त्याच्या कडेला, पदपथावर सुजाण नागरिक घरातील कचरा आणून टाकत आहेत. येथील परिसरातून ये-जा करताना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
हेच नागरिक महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे सतत तक्रार करीत असतात. सांगवी पिंपळे गुरव परिसरात काही भागात सुजाण नागरिक स्मार्ट असल्याने तिथे कचऱ्याचे ढीग दिसून येत नाहीत. यामध्ये शनी मंदिर, फेमस चौक, कृष्णा चौक, क्रांती चौक, स्वामी विवेकानंद नगर आदी परिसरात स्वच्छता असल्याचे दिसून येत आहे.