अमृता फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका
मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक सुरू आहे. त्यातच आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीने उडी घेतली आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही अशी बोचरी टीका अमृता फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही असं विधान कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यासाठी फडणवीसांनी, केवळ गांधी आडनाव असून चालत नाही. त्यांच्यासारखे काम करावे लागते. त्यानुसार काम केले तरच माणसे मोठी होतात, अशी टीका ट्विटरद्वारे केली होती.
Very true @Dev_Fadnavis ji ! One cannot be a ‘Thackeray’ also by just putting ‘Thackrey’ surname after his name ! One needs to be true, principled & should think for betterment of people & party members above his own family & power dynamics ! @ShivSena @OfficeofUT https://t.co/3W0AsvcTeG
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) December 22, 2019
फडणवीसांच्या याच ट्विटचा धागा पकडून अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्याची संधी साधली. देवेंद्र फडणवीसांच्या राहुल गांधींबाबतच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना अमृता यांनी, खरं आहे देवेंद्र फडणवीसजी त्याचप्रमाणे केवळ ठाकरे आडनाव लावल्यानेही कोणी ठाकरे होत नाही त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागतं एखाद्याने स्वतःचे कुटुंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते असे ट्विट करत उद्धव ठाकरेंवर झोंबणारी टीका केली आहे. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग देखील केले आहे.