पिंपरी : शहरातील असा कोणताही रस्ता गतिरोधकाविना नाही. रहिवासी परिसरातून वाहने वेगात जाऊन अपघात होऊ नये, यासाठी स्थानिक नागरिकांचा गतिरोधक उभारावेत यासाठी आग्रह असतो. त्यामुळे वाहतूक विभागाकडून परवानगी न घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही निकष न पाळता गतिरोधक उभारण्यात येतात. अपघात टाळण्यासाठी तयार करण्यात आलेले गतिरोधकच चुकीच्या बनावटीमुळे अपघाताचे आणि दुचाकी चालकांच्या पाठदुखीचे कारण ठरत आहेत. सर्वांत आश्चर्याची बाब म्हणजे शहरातील शेकडो गतिरोधकांपैकी केवळ 111 गतिरोधक नियमांनुसार उभारण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात जवळपास दोन हजारांहून अधिक गतिरोधक उभारण्यात आले आहेत. यापैकी केवळ 111 गतिरोधक वाहतूक विभागाची परवानगी घेऊन नियमानुसार बांधण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड जागृत नागरिक महासंघाने याबाबत एक सर्व्हे केला. या सर्व्हेतून ही बाब समोर आली आहे.
आयआरसीच्या नियमानुसार गतिरोधकाची उंची ही 10 ते 12 सेंटीमीटर आणि दोन्ही बाजूला रुंदी सुमारे सहा फूटइतकी असावी. गतिरोधक दुरूनच दिसावा आणि वाहनचालकाला वेग कमी करता यावा, यासाठी त्यावर पांढरे पट्टे असणे गरजेचे आहे. मात्र शहरातील बहुतांश गतिरोधक हे अवैध असून यामुळे कंबरदुखी व मणक्याचे त्रास होत आहेत. तसेच वाहनेही खिळखिळी होत आहेत.
शहरातील अवैध गतिरोधक काढून “आयआरसी’च्या नियमानुसार गतिरोधक उभारण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांनीही अवैध गतिरोधकाबद्दल पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला माहिती देऊन हे गतिरोधक काढण्यास सांगितले आहे. परंतु पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. दुचाकीचालक व
प्रवाशांनाही त्रास शहरातील काही गतिरोधक मोठे असून तर काही अरुंद परंतु उंच असल्याने दुचाकीचालकांसाठी त्रासदायक ठरत आहेत.
विशेषतः ज्या चालकांच्या दुचाकी जुन्या आहेत आणि शॉक ऑर्ब्जर क्षमतेनुसार काम करत नाहीत, अशा दुचाकींच्या चालकांना हे गतिरोधक अतिशय त्रासदायक ठरत आहेत. गल्लीबोळात कमी अंतरावर गतिरोधक बांधण्यात आले आहेत. या गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्यामुळे वाहनचालकांना अंदाज येत नाही. तसेच रिक्षा व पीएमपीच्या बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही गतिरोधकाचे हादरे त्रासदायक ठरत आहेत.