नगर (प्रतिनिधी) – नगरच्या एमआयडीसीमधील प्लँटमधून ऑक्सिजन निर्मिती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यातून लवकरच ऑक्सिजन निर्मिती सुरु होईल. विशेष म्हणजे यातून मिळणारा ऑक्सिजन नगरमधील कोविड रुग्णलयांनाच मिळेल. नगर शहरातील रुग्णालयांनाच प्राधान्य देण्याची विनंती उद्योजकास केली असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.
नगर शहराजवळील एमआयडीतीत सुरु करण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लँटची पाहणी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आज मध्यरात्रीनंतर पुन्हा केली. तेथील कामाच्या स्थितीची पाहणी केल्यानंतर महापौर वाकळे यांनी उद्योजक व तेथील व्यवस्थापनासोबत चर्चा केली. या प्लँटमधून दररोज किमान 500 ते 600 टाक्यांचे वितरण होईल, अशी क्षमता त्या प्लँटची असल्याची माहिती वाकळे यांनी दिली.
ऑक्सिजनचा तुटवडा भरुन काढण्यासाठी महापौर वाकळे यांनी दोन दिवसांपूर्वी एमआयडीसीमधील उद्योजक रमेश लोढा यांच्याशी चर्चा केली होती. त्यानुसार लोढा यांनी नगरच्या वैद्यकीय गरजेनासाठी दररोज किमान सहाशे टाक्या ऑक्सिजन निर्मिती करणार असल्याची ग्वाही दिली होती. तथापि, त्यास पुन्हा विलंब होत असल्याने महापौर वाकळे यांनी सद्यस्थितीत सुरु असलेल्या कामाची पुन्हा पाहणी केली.
ऑक्सिजनमुळे करोना रूग्णांवर उपचार करण्यास डॉक्टरांना अडचण निर्माण होत आहे. त्यासाठी एमआयडीसीतील रमेश लोढा यांच्या अहमदनगर इंडस्ट्रीयल गॅसेज प्रायव्हेट लिमिटेट यांच्या ऑक्झीजन प्लँटला भेट देवून महापौर वाकळे यांनी त्यांना प्लँट पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास विनंती केली होती. उद्यापासूनच ऑक्सीजन प्लँट सुरू होईल, असे ते म्हणाले होते. तेथेन 600 ऑक्सीजनच्या टाक्या भरल्या जातील. त्यातून नगर शहरात निर्माण झालेला ऑक्सीजनचा तुटवडा काही प्रमाणात भरून निघण्यास मदत होईल, अशी माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.