वॉर्सा (पोलंड) – पृथ्वीच्या पाठीवरील असंख्य रहस्यांचा आजही उलगडा झालेला नाही. अनेक अशा घटना, ठिकाणांबाबतची वैज्ञानिक माहिती शास्त्रज्ञांनी प्राप्त केली असली तरी अनेक रहस्ये आजही तशीच आहेत. पृथ्वीच्या पाठीवर अनेक अशी ठिकाणे आहेत की, तिथल्या घटनांबद्दल वैज्ञानिकही नेमकेपणाने काही सांगू शकत नाहीत. असेच एक गांव पोलंडमध्ये आहे.
गेल्या 12 वर्षांपासून पोलंडमधील एका गावांत सगळ्या दांपत्यांच्या पोटी फक्त मुलीच जन्माला आलेल्या आहेत. म्हणजेच गेल्या 12 वर्षात या गावामध्ये मुलगे जन्माला आलेले नाहीत. या गावाचे हे वैशिष्ट्य ऐकून वैज्ञानिकही अचंबित झाले आहेत. या गावात असे कशामुळे घडते आहे याचे कारण ते शोधू शकलेले नाहीत. पोलंडमधील या गावाचे नाव आहे मिजेस्के ओद्रजेनस्की असे आहे. गेल्या बारा वर्षांपासून या गावात एकाही मुलग्याचा जन्म झालेला नाही, सगळ्या मुली जन्माला आलेल्या आहेत. त्यामुळे 2019 मध्ये गावच्या सरपंचांनी जाहीर केले होते की, गावात ज्या कुटुंबात मुलग्याचा जन्म होईल त्या कुटुंबाला बक्षीस देण्यात येईल.
वैज्ञानिकांनी या गावातील या रहस्यामागील कारण जाणून घेण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. संशोधन केले. परंतु अद्याप त्यांच्या हाती काहीही लागलेले नाही. अगदी पत्रकार, टीव्ही चॅनेलवाल्यांनी देखील यामागील रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण, त्यांनाही काही कळलेले नाही. या गावची लोकसंख्या जेमतेम 300 एवढी आहे.
एकदा जिल्हापातळीवर अग्निशामक दलाने तरुण स्वयंसेवकांसाठी एक विभागीय स्पर्धा आयोजित केली होती. त्यावेळी या गावातील संघात सगळ्या मुलीच असल्याचे दिसून आले आणि तेव्हापासून या गावाच्या वैशिष्ट्याची चर्चा सुरु झाली आहे. गावच्या सरपंचही क्रिस्तिना जिडझियाक या महिला आहेत. त्यांच्या मते अनेकांनी गावातील या वैशिष्ट्यामागील रहस्य शोधण्याचा प्रयत्न केला आहे परंतु, अद्याप कुणालाही यश आलेले नाही.