12 ऑक्टोबरपासून सेवा सुरू होणे प्रस्तावित : अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना दिलासा
पुणे – राज्य सरकारच्या “ग्रीन सिग्नल’नंतर बहुप्रतिक्षित पुणे विभागातील उपनगरीय लोकल सेवा 12 ऑक्टोबरपासून सुरू होणे प्रस्तावित आहे. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक रेल्वे प्रशासनाकडून जाहीर होणार आहे. मात्र, या गाड्यांमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना प्रवेश असणार आहे. पोलिसांकडून यासाठी ई-पास देण्यात येणार असून, “क्यू आर’ कोड असणाऱ्यांनाच प्रवास करता येणार आहे.
अनलॉकनंतर रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. अनलॉक-5 मध्ये राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर “लोकल केव्हा सुरू होणार’ हा प्रश्न अनुत्तरित होता. पुणे विभागातील लोकल सेवेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी पुण्याच्या पोलीस आयुक्तांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली.
सोमवारी पुण्याचे पोलीस आयुक्त आणि नोडल अधिकारी अमिताभ गुप्ता यांनी 12 ऑक्टोबरपासून लोकल सेवा सुरू करणे प्रस्तावित असल्याचे जाहीर केले. यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
लोकल सेवा सुरू करण्याबाबत पोलीस प्रशासन आणि विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. शहरातील विविध शासकीय आस्थांपनांतील कर्मचाऱ्यांना लोकलमध्ये प्रवेश देण्याचे निश्चित झाले आहे.
…अशी घेणार खबरदारी
रेल्वे स्थानक परिसरामध्ये स्थानिक नगरपालिका अधिकाऱ्यांकडून दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. याशिवाय स्थानक परिसराचे बॅरिकेडिंग होणार आहे. पुणे महापालिकेच्या वतीने सर्व रेल्वे स्थानकावर समन्वय अधिकारी नेमण्यात येणार आहेत. पुणे पालिकेडून प्रत्येक फेरीनंतर रेल्वेचे निर्जंतुकीकरण होणार आहे. तर दिवसाअंती रेल्वे प्रशासन करणार आहे. लोकल सेवेची कृती योजना पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखाली राबवण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची माहिती विविध विभागांकडून मागवली आहे.
या आस्थांपनांतील कर्मचारी करू शकतात अर्ज
पुणे शहर आणि पुणे महापालिका हद्दीतील पुणे विभागीय आयुक्त कार्यालय, पिंपरी-चिंचवड महापालिका, व्यवस्थापकीय संचालक कार्यालय (पीएमपीएमएल), राज्य परिवहन विभाग, महावितरण विभाग, जिल्हा परिषद, निगडी प्राधिकरण, जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय (बालेवाडी), आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण विभाग, रेल्वे विभाग, केंद्रीय सरकारी कार्यालय, सर्व शासकीय/ खासगी सहकारी बॅंका, सर्व शासकीय/खासगी रुग्णालये, रक्त तपासणी आणि प्रयोगशाळा, फार्मा कंपनी, न्यायव्यवस्था, आयकर, सीमा शुल्क, टपाल सेवा विभाग, विमान दुरुस्ती आणि देखभाल विभाग, वाणिज्य दुतावास, उच्च आयुक्त आणि आंतरराष्ट्रीय संस्था आदी आस्थापनेतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी लोकलने प्रवास करण्यासाठी डिजिटल पास आणि परवानगी मिळवण्यासाठी अर्ज सादर करू शकत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
…अशी आहे पास प्रक्रिया
प्रवासासाठी संबंधित व्यक्तीसाठी क्युआर कोड आधारित ई-पास प्रणालीचा वापर होणार आहे. www.punepolice.in या लिंकवरून कार्यालयाचे पत्र, आयडी कार्ड, फोटो, फिटनेस प्रमाणपत्र आदी माहिती भरून अर्जदारांना अर्ज ऑनलाइन प्रस्तुत करावा लागणार आहे. पुणे पोलीस आयुक्तालयामार्फत अर्जाची पूर्णत: पडताळणी होऊन प्रवासासाठी त्यांच्या नमूद संपर्क क्रमांकावर क्युआर कोड प्राप्त होणार आहे.