राज ठाकरेंच्या भाषणामुळे फक्‍त करमणूक – खासदार गोपाळ शेट्टी

अनेक मनसैनिक भाजपमध्ये येण्यास इच्छिूक
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी शिवतीर्थावरुन भाजपवर केलेल्या शरसंधाणावर खासदार गोपाळ शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मीडियात टिकून राहण्यासाठी राज ठाकरे यांना अशी भाषणे करावी लागत आहेत. तसेच राज ठाकरे यांच्या भाषणामुळे मतदारांची करमणूक होत असल्याचा टोला गोपाळ शेट्टी यांनी लगावला.
गोपाळ शेट्‌टी म्हणाले, राज ठाकरे यांना मीडियामध्ये राहायचे असेल तर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करावीच लागणार. मोदींवर बोलले नाही तर मीडिया त्यांच्याकडे जाणारही नाही. मला राज ठाकरेंबद्दल किव येते. ज्या कॉंग्रेसने त्यांना सोबत घेण्यास नकार दिला, त्यांच्या प्रचारासाठी आज त्यांना मैदानात उतरावे लागत आहे, अशी टीका त्यांनी केली.

राज ठाकरे आज भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना पाडा, असे सांगत आहेत. मात्र राज ठाकरे यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला निवडणुकीत पाठिंबा देण्याची भूमिका मनसैनिकांना पटलेली नाही. अनेक नाराज मनसैनिक आम्हाला भेटत आहेत. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी ते इच्छुक आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.
मतदार आता हुशार, परिपक्व झाले आहेत. भाषण ऐकूण मतदार आपलं मत बनवत नाहीत. मतदारांना स्वत:च्या मताचं मुल्य कळले आहे. लोक करमणुकीसाठी भाषण ऐकायला जातात. त्यामुळे जे लोक भाषण ऐकायला येतात ते आपल्यालाच मतदान करतील असे कुणीही गृहीत धरु नये, असेही त्यांनी राज ठाकरेंना उद्देशून म्हटले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.