‘फक्त भाजपवालेच रोज गंगास्नान करतात, उर्वरित लोक गटारस्नान करतात का?’

शिवसेनेचा भाजपाला सवाल

मुंबई – शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे.  यानंतर भाजप नेत्यांनी राऊतांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. या टीकेचा समाचार शिवसेनेचे मुखपत्र सामना अग्रलेखातून घेण्यात आला आहे.

काय आहे सामना अग्रलेख?

सध्या महाराष्ट्रात ‘ईडी’ प्रकरण गाजत आहे. महाराष्ट्रातून भाजपची इडा-पीडा गेल्यापासून हे ‘ईडी’ प्रकरण जोर धरू लागले आहे. म्हणजे ईडीचा वापर करून भाजपविरोधकांना नमविण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. याच वातावरणाचा लाभ घेत ईडीस घाबरून भाजपच्या कळपात शिरलेल्या एका ‘महात्म्या’ने ‘ठाकरे सरकार’ पडण्याचा नवा मुहूर्त दिला आहे. आता म्हणे मार्च महिन्यात काही झाले तरी सरकार पडणार! हा मुहूर्त यांनी ‘ईडी पिडी’च्या पंचांगातून काढला की त्यांना झोपेत दृष्टांत झाला? एक मात्र खरे, महाराष्ट्रातील भाजपवाले सत्ता स्थापनेसाठी त्या ईडीवर फारच विसंबून राहिले आहेत.

ईडीच्या वतीने भाजप कार्यालयात हजारेक नोटिसा जणू छापूनच ठेवल्या आहेत व कोणी सत्य बोलू लागले की, त्याच्या नावावर ती नोटीस पाठवून द्यायची, असा एक जोडधंदा सध्या सुरू आहे. ‘ईडी’ची नोटीस वगैरे आली की, चौकशीसाठी संबंधिताने जायलाच हवे. नव्हे, कायद्याचा सन्मान हा व्हायलाच पाहिजे. पण या नोटिसा देशभरात फक्त भाजपविरोधकांनाच का येत आहेत, हा प्रश्न आहे. देशात फक्त भाजपवालेच रोज गंगास्नान करतात व उर्वरित लोक गटारस्नान करतात असे काही आहे काय?

शिवसेनेच्या बाबतीत सांगायचे तर कर नाही तर डर नाही वगैरे ठीकच, पण करून सवरून नामानिराळे राहणाऱ्यांची आमची अवलाद नाही. जे केले त्याची जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाबरीचा विध्वंस! तेथे रणातून पळून गेले ते कर आणि डरचे दाखले देत आहेत. हा विनोदच म्हणावा लागेल.

एकनाथ खडसे यांनी भाजप सोडताच त्यांना ‘ईडी’ची नोटीस यावी याला काय घटनेच्या चौकटीत राहत केलेले कार्य म्हणावे? महाराष्ट्रातही जे लोक ईडीचे गुणगान करून ईडीची नोटीस मिळताच कसे चौकशीला सामोरे जायला हवे असे मार्गदर्शन करीत आहेत, त्यांच्या पार्श्वभागात ईडी चौकशीचा बांबू घुसताच लंगड्या तंगडय़ांनी हे बोलभांड भाजपात सामील झाले. भाजपमध्ये सामील होताच असे सर्व लोक शुद्ध करून घेतले जातात व ईडी याकामी पौरोहित्याचे काम करीत असते. शरद पवार असतील नाहीतर संजय राऊत. खडसे, सरनाईक असतील नाहीतर महाविकास आघाडीतील इतर कोणी, त्यांच्यावरील कारवाया म्हणजे विकृतीचा कळस आहे.

कायद्याच्या अंमलबजावणीचा हेतू शुद्ध असेल तरच तो कायदा जनतेने पाळायचा असतो. बेकायदेशीर आदेश पाळणे हे नागरिकांच्या सनदेमध्ये बसत नाही. सीबीआय, ईडीसारख्या संस्थांचे अधःपतन सध्या जोरात सुरू आहे; पण यावर भाजपचे म्हणणे असे की, काँग्रेसच्या काळात ईडीचा गैरवापर झाला नाही काय? व्वा! काय म्हणायचे या अक्कलशून्य मंडळींना! काँग्रेसने कधीकाळी चुकीचे वर्तन केले म्हणून आम्हालाही अंगास शेण फासण्याचा व शेण खाऊन थयथयाट करण्याचा अधिकार आहे असेच ते म्हणतात. मग हा शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटनाच बदलून तुम्ही ईडी कार्यालयात बसून नवी घटना लिहून काढलीत? हवाबाण थेरपीचा अतिरेक झाला की, मेंदूत सडकी हवा जाते. त्या पादऱ्या हवेच्या ढेकरा सध्या ज्यांना लागत आहेत त्यांचे नाव भाजप! भाजपच्या ‘नव्या घटना समिती’चा विजय असो! डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण! हेच तुमचे भविष्य, असा शब्दात शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.