आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या कामकाजासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया फ
पुणे – महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या कामकाजासाठी हंगामी सल्लागार नेमण्यात येणार आहे. या पदासाठी केवळ 6 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात एका माजी संचालकाचाही समावेश असून त्यांचीच निवड होण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांतील शाळांची निवड करून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्यासाठी हे मंडळ कार्यरत आहे. या आंतरराष्ट्रीय मंडळाच्या कारभारासाठी तात्पुरते नियामक मंडळ नियुक्त करण्यात आलेले आहे. आंतरराष्ट्रीय मंडळासाठी स्वतंत्र कायदा तयार करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रितसर त्यावर अधिकाऱ्यांच्या नियुुक्त्या करण्यात येणार आहेत. काही महिने मंडळाच्या संचालकपदाची सूत्रे बालभारतीचे तत्कालीन संचालक डॉ.सुनील मगर यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र, काही तरी तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने आता शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे मंडळाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
81 शाळांची निवड
या मंडळाची संलग्नता प्राप्त करून देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांकडून अर्ज मागविण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या प्राथमिक शाळांची निवड करण्यात आली. यात 100 शाळांची निवड करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात 81 शाळांची निवड करण्यात आली आहे. शाळांची तपासणी करून ही अंतिम निवड करण्यात आलेली आहे.
खासगी क्षेत्रातील काही जणांनी केले अर्ज
या मंडळाच्या बैठकांचे आयोजन करणे, अहवाल तयार करणे, नियम तयार करून त्याची अंमलबजावणी करणे, स्वतंत्रपणे काम करणे, चालू शैक्षणिक धोरणाची माहिती घेणे या विविध कामकाजासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. एका वर्षासाठी कंत्राटी तत्त्वावरच ही नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. यात फारशा कोणी दिग्गज अधिकाऱ्यांची अर्ज दाखल केलेले नाहीत. खासगी क्षेत्रातील काही जणांची अर्ज केले आहेत. आता अर्जांची छाननी करून नियामक मंडळामार्फत कार्य कक्षा निश्चित करून निवड समितीमार्फत उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर गुणवत्तेनुसार उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येणार आहे. यासाठी एका महिन्याची वाट पहावी लागणार आहे.