नवी दिल्ली – इंधन दरवाढीच्या भडक्यात सामान्य जनता होरपळू लागली आहे. मात्र, ती दरवाढ काही विकसित देशांच्या तुलनेत माफक असल्याची भूमिका केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मंगळवारी लोकसभेत मांडली. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम होऊन काही विकसित देशांत पेट्रोलच्या दरात 50 टक्क्यांनी वाढ झाली. त्याउलट, भारतात तो दर केवळ 5 टक्क्यांनी वाढला, असा दावा त्यांनी केला.
युक्रेनमधील स्थितीवर लोकसभेत झालेल्या चर्चेवेळी पुरी यांनी हस्तक्षेप केला. पेट्रोल दरवाढीचा संदर्भ देऊन त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम केवळ भारतावरच नव्हे; तर संपूर्ण जगावर झाल्याचे म्हटले. युद्धानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील नैसर्गिक वायूचे दर अनेक पटींनी वाढल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच, पेट्रोलच्या दरात 50 टक्क्यांची वाढ अनुभवणारे देश म्हणून त्यांनी अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि
जर्मनीचा उल्लेख केला.
दरम्यान, भारतात मंगळवारीही पेट्रोल आणि डीझेलच्या दरांत लिटरमागे प्रत्येकी 80 पैशांची वाढ झाली. अवघ्या 15 दिवसांतील ती 13 वी दरवाढ ठरली. त्यामुळे पंधरवड्यात दोन्ही इंधने तब्बल 9 रूपये 20 पैशांनी महागली आहेत.