कोथरूडमध्ये फक्‍त 47 टक्‍के मतदान

अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मतदार संघामध्ये मात्र निरुत्साह

पुणे/कोथरूड – अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असणाऱ्या कोथरूड मतदार संघात मतदानाचा उत्साह फारसा दिसून आला नाही. काही ठराविक केंद्र वगळता अन्य कुठेही मतदारांच्या रांगा दिसल्या नाहीत. सकाळपासून मतदानप्रक्रिया संथगतीने सुरू होती. दिवसभरातही मतदानाचा वेग वाढताना दिसला नाही. या मतदार संघात फक्त 47.00 टक्‍के मतदान झाले.

कोथरूडमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व मनसेचे किशोर शिंदे यांच्यात प्रमुख लढत आहे. शिंदे यांना सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीयांची आणि काही प्रमाणात झोपडपट्टीचा भाग या मतदार संघात येतो. पावसाच्या उघडिपीमुळे मतदानाचा टक्‍का वाढेल, अशी शक्‍यता होती.

सकाळी 7 वाजता मतदान प्रकिया सुरू झाल्यानंतर पहिल्या तासात मतदान केंद्रांवर कोणीच नव्हते. सकाळी फिरायला जाणारे नागरिक मतदान करून घरी जाताना दिसत होते. 9 वाजल्यानंतर ऊन पडल्यावर मात्र नागरिक घराबाहेर पडण्यास सुरुवात झाली. कर्वेनगरमधील सम्राट अशोक विद्यालय, ट्री हाऊस शाळा, संभाजी विद्यालय, महेश विद्यालय, पी.जोग स्कूल, परांजपे शाळा, मोरे विद्यालय, एसएनडीटी कॉलेज केंद्रांबाहेर रांगा होत्या. उर्वरित केंद्रांवर मात्र तुरळक गर्दी होती.

सकाळी 9 वाजेपर्यंत फक्‍त 9 टक्‍के मतदान झाले होते. बाणेर-बालेवाडी, पाषाण या भागांतही अशीच स्थिती होती. येथील बाबुराव कटके शाळा मतदान केंद्रात दुपारपर्यंत फक्‍त 36 टक्‍के मतदान झाले होते. तीच परिस्थिती बालेवाडीत होती. पाषाणमध्ये शेवटच्या टप्यात फक्‍त काही मतदान केंद्रावर गर्दी होती.

सकाळी 11 वाजेपर्यंत मतदानात थोडी वाढ होऊन ते 14 टक्‍क्‍यांपर्यंत गेले होते. त्यानंतर दुपारच्या सत्रात त्याचा जोर थोडा ओसरला. 1 वाजेपर्यंत फक्‍त 24.31 टक्‍के मतदान झाले होते. दुपारी 1 ते 3 वेळेत तर मतदान केंद्र ओस पडली होती. या दोन तासांत 10 टक्‍के मतदान वाढले आणि 35 टक्‍क्‍यांपर्यंत ही संख्या वाढली होती. शेवटच्या टप्प्यात मात्र मतदारांना बाहेर काढण्यासाठी काही ठिकाणी कार्यकर्ते लगबग करताना दिसले. विशेष करून शास्त्रीनगर, कर्वेनगर, पाषाण भागांत जास्त कार्यकर्ते फिरताना दिसत होते.

मतदानाची टक्‍केवारी घसरल्याने दोन्ही उमेदवारांची धाकधुक वाढली आहे. यंदा उमेदवारांची संख्या सुद्धा जास्त नसल्याने त्याचा फरक मतदानावर पडलेला दिसला. कार्यकर्त्यांची संख्या अगदी तुरळक होती. अनेक ठिकाणी तर कार्यकर्त्यांनी दुपारनंतर मतदान केंद्रांकडे पाठ फिरवली.

Leave A Reply

Your email address will not be published.