पिंपरी – शनिवारी चिंचवडमधील महापालिकेच्या तालेरा रुग्णालयास आग लागली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. मात्र यामुळे रुग्णालयाच्या फायर ऑडिटचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात सुरू असलेल्या 397 रुग्णालयांपैकी केवळ 43 रुग्णालये फायर ऑडिटमध्ये पास झाली आहेत. तर 354 रुग्णालयांच्या फायर ऑडिटमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटी दूर केलेल्या नसतानाही संबंधित रुग्णांलयांना नूतनीकरणाचा परवाना महापालिका प्रशासनाकडून देण्यात येत असल्याने भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गेल्या वर्षी दुसऱ्या करोनाच्या लाटेत राज्यातील विविध शहरात असलेल्या रुग्णालयांमध्ये लागलेल्या आगीत अनेक रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. यामुळे रुग्णालयाच्या फायर ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर आला. पिंपरी चिंचवड शहरात असलेल्या 132 कोविड रुग्णालयांचे फायर ऑडिट पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाने केले. तसेच महापालिकेच्या रुग्णालयांचे ऑडिटही पिंपरी चिंचवड महापालिकेने केले. उर्वरित रुग्णालयांना खासगी संस्थेकडून फायर ऑडिट करण्याच्या सूचना अग्निशामक विभागाने दिल्या.
शहरात 473 खासगी रुग्णालये आहेत. त्यापैकी 76 रुग्णालये बंद झालेली आहेत. उर्वरित 397 रुग्णालयांना फायर ऑडिट करण्यास सांगण्यात आले होते. या रुग्णालयांनी खासगी संस्थेकडून फायर ऑडिट केले. त्यापैकी शहरातील केवळ 10 रुग्णालयांची अग्निशामक यंत्रणा व इतर नियमांप्रमाणे कामे झाल्याचे दिसून आले. तर ऑडिटमधील त्रूटींनतर 33 रुग्णालयांची त्रूटींची पूर्णता करून त्याबाबतचा अहवाल अग्निशामक विभागास दिला. उर्वरित 354 रुग्णालयाच्या फायर ऑडिटमधील त्रूटी अद्याप कायम आहेत.
रुग्णालयांना दोन जीने असावेत, असा कायदा 2015 मध्ये आला. त्यामुळे त्यापूर्वीच्या रुग्णालयांना एकच जिना असल्याचे दिसून येते. प्रत्येक रुग्णालयात अग्निशामक सिलिंडर (फायर इस्टिंगविशर) असणे बंधन कारक असून हे उपकरण कसे हाताळायचे, याबाबत प्रत्येक कर्मचाऱ्यास प्रशिक्षण असणे गरजेचे आहे. तसेच जिना व कॉमन पॅसेजमध्ये कोणताही अडथळा असू नये, हा देखील नियम आहे. रुग्णालयात जास्तीत जास्त हवा खेळती राहिल, याकडेही लक्ष देणे गरजचे असते. तसेच रहिवासी किंवा व्यापारी संकुलात हॉस्पिटल असू नये. हॉस्टिपलची इमारत स्वतंत्र असावी, असा कायदाही करण्यात आला आहे. पूर्वी 50 किंवा त्यापेक्षा अधिक बेड असलेल्या रुग्णालयांना फायर ऑडिट अनिवार्य होते. मात्र आता 25 बेड असलेल्या रुग्णालयांनाही फायर ऑडिट करणे बंधनकारक आहे.
कोविड काळात आगीच्या जादा घटना का?
करोना झालेल्या बहूतांश रुग्णालयात ऑक्सिजनचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. तसेच अतिदक्षता विभाग बंदीस्त असल्याने येथील ऑक्सिजन गळतीनंतर तो ऑक्सिजन त्या खोलीतच राहत असे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यास त्यास पूरक असलेला ऑक्सिजन त्या ठिकाणी मिळाल्यावर अगदी अल्पवधीत आग रौद्र स्वरूप धारण करीत असे.
पालिका प्रशासनाची भूमिका महत्त्वाची
पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णालयांना फायर ऑडिट करून घेण्यासाठी पालिका प्रशासनाने महत्त्वाची भूमिका बजाविणे गरजेचे असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. तालेरानंतर शहरात आगीची घटना घडू न देण्यासाठी खासगी रुग्णालयांनीही स्वत:हून पुढाकार घेत फायर ऑडिटमधील त्रुटी दूर करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.