अग्निशामक विभागाकडून ना हरकत दाखला वाटपाला सुरुवात
पिंपरी – दिवाळी अवघ्या पंधरा दिवसावर आली असल्याने फटाके विक्रेत्यांनी स्टॉल लावण्यासाठी अग्निशामक विभागकडून दाखले व ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी सुरुवात केली आहे. यासाठी अग्निशामक विभागाने काही अटी ठेवल्या आहेत. त्या अटी पूर्ण करणाऱ्या आणि आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करणाऱ्यांनाच हे दाखले दिले जात आहे. 7 ऑक्टोबर पासून दाखले देण्यास सुरुवात झाली आहे. शहरात शेकडो विक्रेते लहान-मोठ्या प्रमाणात फटाक्यांची विक्री करत असतात, परंतु आत्तापर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील केवळ 28 जणांनी यासाठी अर्ज केले आहेत.
दिवाळीसाठी शहरात अनेक ठिकाणी फटाका विक्रीचे स्टॉल लागतात. मात्र, त्याची सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक असल्याने अग्निशामक विभागाकडून याबाबत सर्व तपासाणी केल्यावर त्यांना दाखले दिले जातात. यासाठी अग्निशामक विभागाकडून काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. त्याची पूर्तता केल्यावरच विक्रेत्यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी 7 ते 18 ऑक्टोबर पर्यंत अर्ज वाटप होणार आहे. तर, भरलेले अर्ज 18 ऑक्टोबर पर्यंत द्यायचे आहे. आत्तापर्यंत 28 जणांनी फटाका विक्री दुकानाच्या परवानगीचे अर्ज घेतले आहेत. गेल्या वर्षी 36 जणांनी परवानगी घेतली होती, याबाबतची माहिती अग्निशामक विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दाखला मिळविण्यासाठी पूर्ण कराव्या लागणार अटी –
फटाका स्टॉलसाठी पक्के आरसीसीचे रोलिंग शटरसह दुकानाचा गाळा असावा, गतवर्षीच्या महापालिकेचा दुकान गाळ्याचा कर भरलेल्याची पावती, दुकानाच्या मूळ मालकाचे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र, आधारकार्ड किंवा मतदान ओळखपत्र याची पूर्तता करावी लागणार आहे.