वर्षभरात 14 किलोमीटरपैकी फक्‍त 200 मीटरचे काम पूर्ण

  • कशी होणार इंद्रायणी प्रदूषणमुक्‍त : वर्षभरात काम पूर्ण करण्याचे आव्हान

पिंपरी – इंद्रायणी नदीतील प्रदुषणाचा विळखा कमी करण्यासाठी महापालिकेने इंद्रायणी नदीसुधार पुनरूज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी प्रकल्प पाहणी अहवाल तयार करण्यात आला आहे. वर्षभरापूर्वी सुरू केलेल्या या प्रकल्पात जवळपास 14 किलोमीटर इतक्‍या लांबीची इंटरसेप्टर सिव्हर लाइन टाकण्यात येणार आहे. सध्या केवळ 200 मीटर लाइनचेच काम झाले आहे. कामासाठी असलेल्या उर्वरित वर्षभराच्या मुदतीत काम पूर्ण करण्याचे महापालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून 16 किलोमीटर अंतरात इंद्रायणी नदी वाहते. नदीच्या एका बाजूचा काठ महापालिका कार्यक्षेत्रात आहे. तर, दुसरी बाजू “पीएमआरडीए’च्या कार्यक्षेत्रात येते. इंद्रायणी नदीस दोन्ही बाजूने शहरातून येणारे नैसर्गिक स्त्रोत, नाले मिळतात. शहरातील औद्योगिक भागातून निर्माण होणारे सांडपाणी नाल्याद्वारे नदीत मिसळत आहे. त्यामुळे नदीतील जलचरांना धोका निर्माण होत आहे. हे सर्व टाळण्यासाठी शहरातील इंद्रायणी नदीचे पुनरूज्जीवन प्रकल्प राबविण्याचा अंतर्भाव महापालिकेच्या अंदाजपत्रकात केला आहे.

या कामासाठी अनुभवी तांत्रिक सल्लागार एचसीपी प्लॉनिंग प्रायव्हेट लिमिटेड (अहमदाबाद) यांची नेमणूक केली आहे. संबंधित सल्लागाराने प्रकल्पाचा भाग म्हणून संपूर्ण नदीचे सर्वेक्षण करून (तळवडे ते डूडूळगाव) नदीपाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रकल्प पाहणी अहवाल तयार केलेला आहे.

या अहवालातंर्गत नदीच्या दोन्ही बाजूस प्रदुषण रोखण्यासाठी, नदीची जैवविविधता अबाधित ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. तथापि, सद्य:स्थितीत महापालिका हद्दीतील नदीच्या दक्षिणेकडील बाजूचे प्रदूषण टाळण्यासाठी टप्पा-1 अंतर्गत सुमारे 13.90 किलोमीटर (तळवडे ते डूडूळगाव दरम्यान) इतक्‍या लांबीची इंटरसेप्टर सिव्हर लाइन टाकण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. तसेच, 7 नाल्यांवर मॅकेनिकल जाळी बसविण्यात येणार आहे. नाल्याद्वारे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी नाल्यामधून वाहणाऱ्या तरंगत्या वस्तू नदीमध्ये जाण्यापूर्वी काढण्यात येतील. त्याबाबतची निविदा वर्षभरापूर्वी काढण्यात आली.

प्रकल्पाची सद्य:स्थिती काय?
इंद्रायणी नदी पुनरूज्जीवन प्रकल्पासाठी 47 कोटी 62 लाख इतका खर्च करण्यात येणार आहे. 18 सप्टेंबर 2019 ला त्याबाबत कामाचे आदेश देण्यात आले. काम पूर्ण करण्यासाठी 17 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदत आहे. भूमी अभिलेख विभागाकडून नदीची हद्द निश्‍चित केल्यानंतर हे काम करायचे आहे. हद्द निश्‍चितीचे कामही संथ गतीने होत आहे. चिखली ते तळवडे या भागात फक्‍त 200 मीटरपर्यंतच्या इंटरसेप्टर सिव्हर लाइनचे काम झालेले आहे. पावसाळ्यामुळे नदीमधील प्रवाह जास्त असल्याने काम संथ गतीने सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.