पुणे -शनिवारवाडा पाहायला जाणाऱ्या पर्यटकांना आता तिकिटासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही. पुरातत्व विभागाकडून डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देत शनिवारवाडा प्रवेशासाठी ऑनलाइन तिकिटाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी शनिवारवाड्याच्या परिसरात क्यूआर कोड असणारे फलक लावले आहेत.
मागील काही वर्षांपासून मराठा साम्राज्यावर आधारित चित्रपट आणि मालिका निर्मितीचा “ट्रेन्ड’ रूजत आहे. यामुळे नागरिकांचा ऐतिहासिक ठिकाणे पाहण्याकडे कल वाढत आहे. याला शनिवारवाडादेखील अपवाद नाही. सलग सुट्ट्यांच्या निमित्ताने मागील आठवड्यापासून शनिवारवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.
प्रचंड गर्दीमुळे पर्यटकांनी शनिवाड्याचा परिसर फुलला असला तरी देखील, प्रवेश तिकीट मिळवण्यासाठी त्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. मात्र, येत्या काळात नागरिकांना गर्दी असतानाही कमीतकमी वेळात शनिवारवाड्यात जाता येणार आहे.
शनिवारवाड्याचे प्रवेश तिकीट काढण्यासाठी एकच खिडकी असल्याने एका तिकिटासाठी किमान पाच ते दहा मिनिटे नागरिकांचा वेळ जातो. उन्हाळ्यात तर लांब रांगांमध्ये ताटकळत उभे राहावे लागते.
या रांगांवर तोडगा काढण्यासाठी पुरातत्व खात्याकडून “ऑनलाइन’चा पर्याय स्वीकारला आहे. यामुळे आता पर्यटकांना “ऑनलाइन पेमेंट’ करत तिकीट काढता येणार आहे. सध्या “ऑनलाइन पेमेंट’चा वापर अधिक प्रमाणावर करण्यात येतो. विशेषत: शनिवारवाड्याला भेट देणाऱ्या तरुणाईसाठी “ऑनलाइन पेमेंट’चा पर्याय फायदेशीर ठरणार आहे. याबाबतचे माहिती फलकदेखील प्रशासनाकडून बसवण्यात आल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.