पुणे – करोना पार्श्वभूमीवर कलासंस्थांच्या महाविद्यालयात 1 सप्टेंबरपासून ऑनलाइन अध्यापन सुरू होणार आहे. प्राचार्यांनी याचे रेकॉर्डही अपडेट करून ठेवणे बंधनकारक केले आहे.
मार्चपासून राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यात ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. कला संचालनाच्या अधिपत्याखालील शासकीय, शासनमान्य अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित कला संस्थांनाही ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याचे वेध लागले होते. ऑनलाइन दैनंदिन अध्यापनाबाबत अध्यापकांनी निवेदनही सादर केले होते.
कला संचालनालयाच्या पदविका अभ्यासक्रमाचे दैनंदिन अध्यापन व अनुषंगिक कामकाज, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित व करोना परिस्थितीत लक्षात घेऊन ऑनलाइन पूर्ण करणे आवश्यक आहे. रेखा व रंगकला, उपयोजित कला व शिल्पकला (इंटरमिजिएट, ऍडव्हान्स व डिप्लोमा), तसेच कलाशिक्षक, पदविका, वस्त्रकाम, अंतर्गत सजावट आदी अभ्यासक्रमांचे 2020-21 या शैक्षणिक वर्षातील ऑनलाइन अध्यापन सुरू करण्याची योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश राज्य शासनाच्या कला संचालनालयाचे कला संचालक राजीव मिश्रा यांनी कलासंस्थांच्या प्राचार्य व अधिष्ठाता यांना बजाविले आहेत.
ऑनलाइन अध्यनाबाबतची विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद, पूर्ण केलेल्या स्वाध्यायाच्या नोंदी, इमेजेस, अध्यापनाचे व अनुषंगिक बाबींची परिपूर्ण संगणकीकृत माहिती प्राचार्यांनी संग्रही ठेवणे आवश्यक आहे. वेळोवेळी तपासणीसाठी येणाऱ्या तज्ज्ञांना माहिती उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या समस्यांचे समाधान व वेळोवेळी मार्गदर्शन करता यावे याकरिता व्हॉट्स ऍप किंवा अन्य साधनांच्या माध्यमातून संपर्कात राहावे लागणार आहे. चालू शैक्षणिक वर्षाच्या कामकाजाचे दिवस पूर्ण करण्यासाठी आवश्यकता असल्यास सुट्टीच्या दिवशीही अध्यापनाच्या दैनंदिन कामकाज करण्यात यावे, असेही आदेशात नमूद केले आहे.