सोमवारपासून होणार प्रक्रिया सुरू
पिंपरी (प्रतिनिधी) – रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध घातल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने येस बॅंकेतील दैनंदिन भरणा थांबवला आहे. नागरिकांकडून भरण्यात येणारा कर व पाणीपट्टीही ऑनलाइन पद्धतीने भरण्याची प्रक्रियाही थांबवली आहे. प्रशासनाच्या वतीने ही प्रक्रिया सुरळित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र यामुळे नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. तांत्रिक काम सुरु असून अजून दोन दिवस त्यासाठी लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महापालिकेच्या ठेवी खासगी बॅंकेत ठेवू नये, असा नियम असतानाही महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी येस बॅंकेत 984 कोटी रुपये ठेवले. अर्थिक स्थिती खालावल्याने या बॅंकेवर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेचीही रक्कम बॅंकेत अडकली आहे. महापालिकेकडून मालमत्ता कर, पाणीपट्टी वसूल केली जाते. तसेच बांधकाम परवानगीमधून देखील दररोज उत्पन्न मिळते. महापालिकेने ऑगस्ट-2018 मध्ये चिंचवड येथील येस बॅंकेच्या शाखेत बचत खाते उघडले होते. तेव्हापासून दैनंदिन जमा झालेली रक्कम या बॅंकेच्या खात्यामध्ये ठेवण्यात येते. या बॅंकेवर निर्बंध घातले आहेत. दहा वर्षांपूर्वी महापालिकेने ऑनलाइन मालमत्ताकर व पाणीपट्टी भरण्याची सुविधा शहरवासियांना दिली. एक “क्लिक’वर घरबसल्या कर भरता येत असल्याने नागरिकांनी त्याचे स्वागत केले. सध्या अर्थिक वर्षाचा शेवटचा महिना सुरू आहे.
मार्चअखेर असल्याने नागरिकांकडून पाणीपट्टी व कर भरण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र येस बॅंकेवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे येस बॅंकेतील ट्रान्झक्शन गुरुवारी रात्री बारा वाजल्यापासून थांबविण्यात आले आहे. यापुढे बॅंक ऑफ बडोदामध्ये मालमत्ताकर, पाणीपट्टी, बांधकाम परवानगीतून येणाऱ्या दैनंदिन उत्पन्नाचा भरणा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ऑनलाईन सिस्टीम अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
येस बॅंकेत भरला जाणार ऑलाइन कर थांबवला आहे. त्यामुळे ऑनलाइन पैशांचा व्यवहार होत नाही. बॅंक ऑफ बडोदामध्ये ऑनलाइन भरणा करण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. बॅंकेतील आयटी टीमला महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागात बोलावण्यात आले आहे. ऑनलाइन सिस्टीम सुरु करण्याचे प्रयत्न सुरू आहे. नागरिकांचे पैसे दुसरीकडे जाऊन काही गैरप्रकार होऊ नये यासाठी पहिल्यांदा चाचणी केली जाणार आहे. त्यानुसार काम सुरू आहे. सोमवारी ऑनलाइन कर भरण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
– निळकंठ पोमण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, महापालिका