शाळा, क्लास बंद असल्याचा परिणाम; उपजीविकेसाठी धडपड
पिंपरी – खासगी शाळा, कोचिंग क्लासेस बंद असल्याने अनेक शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी आता शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ऑनलाइन शिकवणीचा आधार घेत आहेत. अनेक शिक्षकांनी उपजिविकेसाठी यूट्यूबवर आपल्या क्लासचा चॅनल सुरू केला आहे. त्यामधून विद्यार्थ्यांनाही शिकवले जात असून शिक्षकांनाही उपजिविकेसाठी हातभार लागत आहे.
राज्यामध्ये मार्च महिन्यामध्ये करोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली. त्यानंतर शाळा व खासगी क्लास बंद करण्यात आले. गेल्या सहा महिन्यांपासून शाळा व क्लास बंद आहेत. महापालिकेच्या शिक्षकांना कोविडची ड्युटी आहे. मात्र खासगी आस्थापनेवर शिकविणाऱ्या व खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक तरुणांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. मात्र त्यांना नोकरी नसल्याने त्यांनी खासगी शिकवणीचा पर्याय निवडला होता. मात्र करोनामुळे सर्वच खासगी शिकवण्या बंद झाल्याने शिक्षकांनी पर्याय शोधत यूट्यूबवर आपले क्लास घेण्यास सुरूवात केली आहे.
जे शाळेमध्ये शिक्षक शिकवतात त्या शिक्षकांची पद्धत व त्यांच्या बोलीभाषेत विद्यार्थ्यांना अभ्यास समजून घ्यायला आवडतो. विद्यार्थ्यांना जड भाषा वापरली तर त्यांना ती पचनी पडत नाही. यामुळे स्थानिक भाषेतील शिक्षकांचे यूट्यूवबरील अभ्यासक्रमाचे व्हिडिओ बघण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.
– अमोल कापसे, प्राध्यापक