पुणे : इएफओ अर्थमंत्रालय दिल्ली येथून बोलत असल्याची बतावणी करत सायबर चोरट्याने एका व्यक्तीला त्यांच्या वडिलांचे इन्शुरन्सचे 3 लाख 40 हजार रूपये मिळणार असल्याचे सांगून तब्बल 5 लाख रूपयांचा ऑनलाईन गंडा घातला.
याप्रकरणी बिबवेवाडी परिसरातील एका 43 वर्षीय व्यक्तीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीच्या विरुद्ध आयटी अॅक्टसह फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यक्ती एका खासगी कंपनीत कामाला आहे. 22 ते 28 जानेवारी दरम्यान सायबर चोरट्याने त्यांना फोन करून इएफओ अर्थमंत्रालय दिल्लीतून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या वडिलांचे ग्रुप इन्शुरन्सचे 3 लाख 40 हजार रूपये मिळणार असल्याची बतावणी केली. मात्र ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी काही पैसे भरावे लागतील असे सांगितले.
फिर्यादींनी सायबर चोरट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याने सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी आॅनलाईन माध्यमातून 4 लाख 75 हजार रूपये भरले. मात्र पैसे भरून देखील कोणतेही पैसे मिळत नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास गुन्हे निरीक्षक प्रकाश पासलकर करीत आहेत.