‘सातबारा’साठी ऑनलाइन पेमेंट सुविधा

पुणे – ऑनलाइन सातबारा मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर भूमिअभिलेख विभागाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. ऑनलाइन सातबारा उताऱ्यासाठी आता ऑनलाइन पद्धतीने पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. यासाठी “स्टेट बॅंक ऑफ इंडिया’बरोबर करार करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. त्यामुळे डेबिट, क्रेडिट कार्डसह विविध ऍपच्या माध्यमातून शुल्क भरून कोठूनही डिजिटल स्वाक्षरी असलेला ऑनलाइन सातबारा उतारा काढता येणार आहे.

भूमिअभिलेख विभागाकडून सातबारे, फेरफार आदी प्रकारचे दस्ताऐवज ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. यापूर्वी भूमिअभिलेख विभागाकडून सातबारे उताऱ्यांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. तसेच ई-फेरफार अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने सातबारा उताऱ्यावर नोंद घेतली जात आहे. याच योजनेचा पुढचा भाग म्हणून नागरिकांना ऑनलाइन सातबारे उतारे उपलब्ध करून देण्यात येत होते. भूमीअभिलेख विभागाने मागील वर्षापासून डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारे ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची मोहीम सुरू केली होती.

राज्यात सुमारे 44 हजार गावे आहेत. यापैकी 41 हजार गावांमधील सातबारा बिनचूक सातबारा उतार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामध्ये दररोज एक ते दीड लाख डिजिटल सातबारा उताऱ्यांची भर पडत आहे. त्यामुळे एका किल्कवर सातबारा उतारा नागरिकांना सध्या उपलब्ध होत आहे.

ऑनलाइन सातबारा सशुल्क करण्याचा निर्णय भूमिअभिलेख विभागाने घेतला होता. त्यासाठी पंधरा रुपये शुल्क आकारण्यात येते. सध्या हे शुल्क रोखीने भरावे लागत होते. ते आता स्टेट बॅंक ऑफ इंडीयाच्या पेमेंट गेटवेच्या माध्यमातून भरता येणार आहे.

ऑनलाइन सातबारा उताऱ्यासाठी ऑनलाइन शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाबरोबरच करार करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच ही सुविधा उपलब्ध होणार असून नागरिकांना घरबसल्या डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारा काढणे शक्‍य होणार आहे.
– रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)