मुळशी तालुक्यातील विकासकामांबाबत घेतला आढावा
पिरंगुट (वार्ताहर) – मुळशी तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ही कामे लवकर पूर्ण व्हावीत यासाठी पीएमआरडीए, पीडब्ल्यूडी आणि सर्वच शासकीय यंत्रणेची ऑनलाइन बैठक घेऊन संबंधितांशी याबाबतीत चर्चा करणार असल्याचे बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
पौड (ता. मुळशी) येथे पंचायत समितीच्या सेनापती बापट सभागृहात शासकीय अधिकारी व पंचायत समिती पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी खासदार सुळे बोलत होत्या. यावेळी तहसीलदार अभय चव्हाण, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, गटविकास अधिकारी संदीप जठार, सभापती पांडुरंग ओझरकर, उपसभापती विजय केदारी, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, अंजली कांबळे, अधिकारी, पदाधिकारी आणि विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, शासकीय कर्मचारी उपस्थित होते.
निसर्ग चक्रीवादळाचा फटका मुळशी तालुक्याला अधिक बसला आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आठ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले, तसेच तालुक्यात मनरेगाची कामे पटापट करून घेण्याची सूचना केली. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच शाळा बंद आहेत, त्या सुरू करण्याबाबत विविध मते मांडली गेली.
शाळांच्या फीबाबत खासगी शाळांकडून होणारी मागणीही पालकांसाठी त्रासदायक असल्याचे चर्चेत बोलले गेले. यावर सुळे म्हणाल्या, पालकांनी फी नाही भरली तर शिक्षकांना पगार मिळणार नाही आणि मग ती शाळा बंद पडू शकते. त्यामुळे दोन्ही बाजूने विचार करणे गरजेचे आहे. शासन शाळांबाबत काय निर्णय घेते, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल. याबाबत राज्य सरकार योग्यच निर्णय घेतील अशी आशा व्यक्त केली.