नगर -नगरमध्ये करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रूग्णांच्या जलद निदानासाठी भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स, जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा रूग्णालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या “मिशन झिरो’ अहमदनगर अभियानांतर्गत मोफत अँटीजेन टेस्ट अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पध्दतीने करण्यात आला.
यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ऑनलाइन सहभागी झाले होते. नगर जिल्हाधिकारी कार्यालयात खा. सदाशिव लोखंडे, माजी खा.दिलीप गांधी, आ.डॉ. सुधीर तांबे, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, इपिटोम कंपनीचे संचालक अनुराग धूत, बीजेएसचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य व मर्चंटस्चे आदेश चंगेडिया, बीजेएसचे शहर अध्यक्ष प्रशांत गांधी, डॉ. एस.एस.दीपक आदी उपस्थित होते. धुत ट्रस्टच्या विना झंवर चेन्नेई येथुन ऑनलाइन सहभागी होत्या.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोविड काळात आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण, जास्तीत जास्त टेस्टिंग व मृत्यूदर शून्य करण्याचे काम सरकार करीत आहे. बीजेएसने मिशन झिरो अंतर्गत अँटीजेन टेस्टसाठी घेतलेला पुढाकार महत्वाचा ठरणार आहे.